श्रीरामपूर (प्रतिनिधी)
पालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर बेलापूर रोड, संगमनेर रोड तसेच नेवासा रोड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागानेही आपल्या हद्दीतील अतिक्रमण हटविले होते. आता शहरातील पाटबंधारे विभागाच्या हद्दीत झालेले अतिक्रमण काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊल उचलले आहे. शहरातील वराह पैदास केंद्र ते सरस्वती कॉलनी परिसरात मेन कॅनॉलच्या कडेच्या सुमारे ३५० अतिक्रमण धारकांना पाटबंधारे विभागाने नोटीसा बजाविल्या आहेत.
मध्यंतरी काही काळ प्रवरा डावा कालवा हद्दीतील थंडावलेली जलसंपदा विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिम पाटबंधारे विभागाने पुन्हा हाती घेतली आहे. त्यानुसार ३५० ते ३७५ अतिक्रमणधारकांना पाटबंधारे विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मेन कॅनॉलच्या वराहपालन केंद्र ते सरस्वती कॉलनी परिसरापर्यंत ही अतिक्रमण मोहिम राबविण्यात येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी शहरात अतिक्रमण मोहिम हाती घेऊन अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर दिवाळी, शारदोत्सव, गणपती उत्सव आल्याने ही अतिक्रमण मोहिम थांबविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा वरिष्ठांच्या निर्देशानुसार नोटिस बजावल्यापासून दि. २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण स्वः तहून काढून घ्यावे, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. अन्यथा दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून पाटबंधारे विभागामार्फत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास प्रारंभ होणार आहे.
शहर व शिरसगाव हद्दीत अनधिकृत अकृषीक जागेचा वापर करणाऱ्यांनाही नोटीस
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४५ (२) नूसार ग्राम महसूल अधिकारी, श्रीरामपूर यांच्याकडील दि. २ फेब्रुवारी २०२६ च्या प्राप्त अहवालानुसार श्रीरामपूर शहर व शिरसगाव हद्दीतील अनधिकृत अकृषीक जागेचा वापर करत असलेल्या २९३ जणांना महसूल विभागानेही नोटीसा बजाविल्या आहेत.





