श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील पाण्याच्या पाटाजवळ संशयास्पदरीत्या फिरणार्या दोन इसमांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चॉपर आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाझीम पठाण (वय 25, रा. वॉर्ड क्र. 2, श्रीरामपूर), मोहम्मदजाफर पटेल (वय 18, रा. काझीबाबा, श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. अपर पोलिस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर व श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.
शहर पोलिस स्टेशन हद्दीतील जर्मन हॉस्पिटलच्या मागे पाण्याच्या पाटाजवळ दोन संशयित व्यक्ती गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये नाझीम पठाण याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व मोबाईल, तर मोहम्मद पटेल याच्याकडून दोन जिवंत काडतुसे, धारदार चॉपर आणि मोबाईल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हे हत्यार शाहरुख पटेल (रा. संजयनगर, श्रीरामपूर) याच्याकडून घेतल्याचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 7, 25 (6) (7) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




