श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरात गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले. त्यांच्याकडून 3 गावठी पिस्टल, 6 मॅगझीन, 10 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल व इर्टीगा कार असा एकूण 7 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली. बबलु ऊर्फ इम्तीयाज अजिज शहा (वय 35, रा. काझीबाबा रोड, बाबपुरा चौक, वॉर्ड नं.2), नदिमखान साबीरखान मनियार (वय 30, रा. नागद रोड, चाळीसगाव, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे असून दोघांवरही निरनिराळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, बेलापूर येथील ऋतुराज बाळासाहेब दाणी व नंदकिशोर संजू शिरसाठ या दोघांना हे गावठी कट्टे विकले जाणार होते.
पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून दोघेही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत. त्यांची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. तसेच गेल्या महिनाभरात पोलिसांनी 10 गावठी कट्टे पकडले असल्याचेही त्यांनी सांगितले. दि.24 सप्टेबर रोजी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना बबलू ऊर्फ इम्तीयाज शहा हा इर्टीगा गाडी (क्र. एमएच 12 एसडी 7338) यामध्ये अवैधरीत्या गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन शहरात संजयनगर रोड, मिल्लतनगर येथे पाटाच्या कडेला पोलिसांनी सापळा लाऊन, सदरची गाडी पकडली.
सदर गाडीमध्ये दोन जण मिळुन आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे बबलू ऊर्फ इम्तीयाज आजिज शहा, नदिमखान शाबीर खान अशी सांगितली. सदर कारची झडती घेतली असता कारच्या डॅशबोर्ड व मागील शिटच्या पॉकेटमध्ये एकूण तीन अवैध गावठी पिस्टल, 6 मॅगझीन व 10 जिवंत काडतुसे मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडील 2 मोबाईल फोन व इर्टीगा गाडी असा एकुण 7 लाख 30 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही आरोपीविरुध्द शहर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट 3,5,7,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देखमुख यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करत आहेत. गुन्ह्याच्या आतापर्यंतच्या तपासात आरोपीविरुध्द निरनिराळ्या पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने काही संशयितांनाही ताब्यात घेतले आहे. अटक झालेल्या दोन आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.





