Wednesday, November 11, 2026
Homeक्राईमShrirampur : दोन गटांतील वादातून गोंधवणीत तुफान दगडफेक; कार जाळली

Shrirampur : दोन गटांतील वादातून गोंधवणीत तुफान दगडफेक; कार जाळली

श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली 8 आरोपींना तात्काळ अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दशमेश चौक ते गोंधवणी रोड परिसरात दोन परस्पर विरोधी गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तुफान दगडफेक करत एका चारचाकी वाहनाला आग लावून परिसरात प्रचंड दहशत निर्माण करणार्‍या आठ आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अटक केली आहे. ही घटना सोमवारी दि. 9 रोजी मध्यरात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोंधवणी गावाकडून दिवाळीचे फटाके फोडून घरी परतणार्‍या तरुणांसमोर एक भरधाव शेअरलेट क्रुझ कार (क्र.एमएच 23 वाय 0001) दशमेश चौकाकडून आली आणि दत्त मंदिरासमोरील सिमेंटच्या गोण्यांना जाऊन धडकली. अपघातात कारचा बंपर तुटून गाडी रस्त्याच्या मधोमध थांबली. यावेळी तेथे उपस्थित असणार्‍या तरुणांनी विचारणा केली असता, एका गटातील मोसीन मुश्ताक शेख, अरबाज शेख, अल्तमश शेख व इतर 5 ते 6 जणांनी लाकडी दांड्याने मारहाण करत रस्त्यावरील दगड उचलून जोरदार दगडफेक केली.

तर दुसर्‍या बाजूने, कारचा अपघात झाल्यानंतर गाडीतील तरुणांना वाचवण्यासाठी व सोडवण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवर आणि वाहनावर तेथे जमलेल्या तेजस मोरे, अनिकेत डफळ, राजू चव्हाण व इतर 15 ते 20 जणांच्या टोळक्याने मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही तुफान दगडफेक केली. यात अल्तमश अश्पाक शेख हा तरुण गंभीर जखमी झाला. एवढ्यावरच न थांबता, टोळक्याने रस्त्यावर उभी असलेली क्रुझ कार ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थाचा वापर करून पेटवून दिली. या घटनेप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी वर्ड नं. 1 बीट चौकीच्या अंमलदारांना व तपास पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून अवघ्या काही तासांत दोन्ही गटांतील आठ आरोपींना निष्पन्न करून अटक केली. यामध्ये पहिल्या गटातील श्रीकांत पोपट गावडे (रा. भैरवनाथनगर, वॉर्ड क्र. 1), अनिकेत रवींद्र डफळ (रा. नॉर्दर्न ब्रांच, वॉर्ड क्र. 7), तेजस राजू मोरे (रा. आदर्श नगर, वॉर्ड क्र. 1), साहिल दत्तात्रय पाटेकर (रा. वॉर्ड क्र. 7), राज जवाहर चव्हाण (रा. गोंधवणी रोड, आंबेडकर कॉलनी, वॉर्ड क्र. 1) यांना तर दुसर्‍या गटातील अरबाज अन्वर शेख (रा. काझीबाबा रोड, वॉर्ड क्र. 2), मोसीन मुश्ताक शेख (रा. काझीबाबा रोड, पाटाचे कडेला, वॉर्ड क्र. 2), अरबाज रफीक देशमुख (रा. काझीबाबा रोड, वॉर्ड क्र. 2) यांना तत्काळ अटक करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे, पोलीस उप-निरीक्षक रोशन निकम, विशाल लहाने, सहाय्यक फौजदार राजू त्रिभुवन, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भिंगारदे, मच्छिंद्र शेलार, सतीश खरात, श्री. इनामदार, सादिक शेख, सचिन दुकळे, रोहित डोंगरे व नंदू लोखंडे यांच्या पथकाने केली. प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोउनि आप्पासाहेब हंडाळ व पोहेकॉ मच्छिंद्र शेलार करत आहेत.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...