श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोर्चा काल वॉर्ड नं.2 मधील बेकायदा कत्तलखान्यांकडे वळाला. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पोलीस बंदोबस्तात त्याठिकाणची सात बेकायदा कत्तलखाने जेसीबी मशिनच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. याठिकाणी सुमारे 70 गोवंशीय जनावरांची कातडी मिळाली. यापुढेही शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अधिकच कडक करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले. दोन दिवसांपासून शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला आहे. काल शहरातील नाना चहा ते सैलानी बाबा दर्गाह परिसरामध्ये रोड लगत व पाटाच्या हद्दीत लाईन आखून मोजमाप करण्यात आले. पत्र्याचे शेड आणि ओटा कमी करण्यास सांगण्यात आले आहे.
नोटीसा आल्यानंतर अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली होती. तर काल वार्ड नं.2 मध्ये बेकायदा असणार्या 7 कत्तलखान्यावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. या ठिकाणी 7 बेकायदेशीर कत्तलखाने असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप याच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात नगर अभियता सुर्यकांत गवळी, अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, रावसाहेब घायवट, अनंत शेळके, लक्ष्मण लबडे, प्रशांत जगधने, अमोल दाडगे, सुभाष शेळके, गौरव काळे, राम शेळके, सिद्धाथ साळवे, रामदास ढोकणे, अमन सय्यद, श्री. ढाकणे आदींनी या अतिक्रमण हटाव मोहीमेत कामगिरी केली.
वॉर्ड न.2 मध्ये असणार्या काझीबाबा रोडवरील बेकायदेशिररित्या चालवले जात असलल्या कत्तलखान्यावर काल पोलिसांच्या बदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. या ठिकाणी 70 गोवंशीय जनावरांची कातडी तसेच काही मांसाचे तुकडे पालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये भरून हे जप्त करण्यात आले, वॉर्ड नंबर दोन मध्ये सकाळी अतिक्रमण हटावचे पथक जेसीबी आणि पोलीस दाखल झाल्यानंतर कोठे कारवाई होते हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणात काझीबाबा रोड, मक्का मस्जिद शेजारी अकरम कुरेशी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कातडी व हत्यार सापडल्याबद्दल शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार – मुख्याधिकारी घोलप
काहीही झाले तरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम ही सुरूच राहणार आहे. ज्यांना आपले नुकसान टाळायचे असेल तर त्या नागरिकांनी आपले अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.