Thursday, May 14, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात उद्योगमंत्री सामंतांचा संताप; शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

Shrirampur : श्रीरामपुरात उद्योगमंत्री सामंतांचा संताप; शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

अल्प उपस्थितीमुळे पदाधिकार्‍यांना फटकारले || नितीन औताडे यांच्याकडे प्रभारी जबाबदारी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाच्या आढावा बैठकीतच उद्योगमंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा पक्ष संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली. बैठकीसाठी अपेक्षित प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित नसल्याने मंत्री सावंत यांनी संघटनात्मक शिथिलतेवर संताप व्यक्त केला. यानंतर केवळ जिल्हाप्रमुख नितीन औताडे हे प्रभारी म्हणून काम पाहतील, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

- Advertisement -

शहरातील जिल्हा बँकेच्या टाऊन शाखेतील भास्करराव गलांडे पाटील सभागृहात शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, तालुकाप्रमुख संतोष डहाळे, शहरप्रमुख उमेश पवार, श्रीरामपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती मंजुश्री मुरकुटे, मुळा-प्रवराचे माजी संचालक सिद्धार्थ मुरकुटे, अशोकचे संचालक निरज मुरकुटे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, इतक्या मोठ्या नेतृत्वाच्या उपस्थितीतही सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या अत्यल्प असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बैठकीसाठी मंत्री उदय सामंत यांचे आगमन होताच, आणखी एक नाट्यमय घडामोड घडली. युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह सभागृहाबाहेरच ठिय्या मांडून बसले होते. युवा जिल्हाप्रमुख असूनही आम्हाला बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही, अशी उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली. पक्षातील अंतर्गत संवादाचा अभाव आणि गटबाजी यामुळेच संघटना कमकुवत होत असल्याची चर्चा यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.
याप्रसंगी काही वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करत शुभम वाघ यांची समजूत काढली आणि त्यांना सभागृहात आणले. मात्र, या सर्व घडामोडींनी बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच अपेक्षेपेक्षा अत्यल्प उपस्थिती पाहून मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकार्‍यांना खडेबोल सुनावले. संघटना वाढविण्याऐवजी पदाधिकारी केवळ पदांपुरते मर्यादित राहिले आहेत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी थेट निर्णय जाहीर करत शिवसेना शिंदे गटाची विद्यमान जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे सांगितले. नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत जिल्हाप्रमुख नितीन औताडे हे प्रभारी म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षश्रेष्ठींनी थेट हस्तक्षेप करून संघटनात्मक फेरबदल केल्याने शिंदे गटात आता मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीकडे चित्ते समर्थकांची पाठ
शहरातील जिल्हा बँकेच्या टाऊन शाखेमध्ये काल उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाची आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीकडे प्रकाश चित्ते समर्थक किरण लुनिया, संजय पांडे, राजेंद्र कांबळे, बबन मुठे, शशिकांत कडुस्कर आदी शहरातील व तालुक्यातील समर्थकांनी पाठ फिरविली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...