श्रीरामपूर (प्रतिनिधी)- महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. अपहरणाचा प्रयत्न झालेला वरुण फोपळे हा श्रीरामपूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल फोपळे यांचा मुलगा आहे.
शहरातील वरुण विशाल फोपळे (वय 17) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकतो. त्याने खासगी शिकवणी लावली आहे. तो खासगी शिकवणीसाठी अखंडानंद आश्रमाजवळ सायंकाळी 5 वाजता गेला असता एका मोटारीतून तिघेजण त्याठिकाणी आले. त्यातील एकाने वरुण यास तुझा मी मामा आहे.
तुझ्या आईने तुला घरी बोलाविले आहे, असे सांगून आपले नाव निलेश फिरोदिया असल्याचे सांगितले. वरुण याच्याबरोबर मारवाडी भाषेत त्याने संवाद केला. मात्र, फिरोदिया आडनावाचे आपले कोणी मामा नाहीत, असे वरुणला माहिती असल्याने त्याने वडील विशाल फोपळे यांना दूरध्वनी केला. वरूणने दूरध्वनी करताच मोटारीतील तिघांनी पळ काढला. मात्र, जातांना त्यांनी वरूणला हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विशाल फोपळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
अपहरणकर्त्यांची मोटार जिजामाता चौकातून गेली. त्या भागातील सीसीटिव्ही कॅमेर्यात झालेले चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. मात्र, खासगी शिकविणी चालक तसेच अन्य व्यावसायिक यांनी केवळ दुकानाच्या मर्यादेतच सीसीटिव्ही कॅॅमेरे लावले आहे. रस्त्यावरील वहातुकीचे छायाचित्रण त्यात होत नाही. आता स्टेट बँकेच्या कॅमेर्यातील चित्रीकरण तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.