Wednesday, October 7, 2026
Homeनगरबिबट्याची दहशत, ऊस फडातून थेट मजुरांच्या दिशेने झेप; श्रीरामपूर तालुक्यातील घटना

बिबट्याची दहशत, ऊस फडातून थेट मजुरांच्या दिशेने झेप; श्रीरामपूर तालुक्यातील घटना

​उक्कलगाव (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील लम्हाणबाबा शिवार आणि धनवाट रस्त्यावरील शेतवस्त्यांवर बिबट्याचा वावर पुन्हा वाढला असून, यामुळे नागरिक व शेतकरी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहेत.सोमवारी सायंकाळी उसाच्या फडातून बाहेर आलेल्या बिबट्याने थेट मजुरांच्या दिशेने झेप घेतल्याची थरारक घटना घडली.
​
येथील थोरात-मोरे वस्तीजवळ सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काही शेतमजूर महिला शेतात घास खुरपणीचे काम करत होत्या. याच दरम्यान अचानक जवळच असलेल्या दाट उसाच्या फडातून एक बिबट्या बाहेर आला आणि मजुरांच्या दिशेने झेपावला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मजुरांची दाणादाण उडाली. मात्र, मजुरांनी प्रसंगावधान राखत त्वरित आरडाओरडा केला आणि सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेने मजुरांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

​बिबट्यासाठी अनुकूल ठरतोय परिसर उक्कलगाव व परिसरातील नदीकाठच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते. पाण्याची उपलब्धता आणि दाट उसामुळे हा परिसर बिबट्यासाठी लपण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरत आहे. या शिवारात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी व शेतमजूर कमालीचे भयभीत झाले असून संध्याकाळनंतर शेतात जाणे मुश्कील झाले आहे.

​शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित भागात त्वरित पिंजरा लावावा आणि या बिबट्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. ​यावेळी प्रकाश थोरात, गणेश मोरे, बाबासाहेब शेरमाळे, संजय चिंधे, पुरुषोत्तम थोरात, ज्ञानेश्वर चिंधे, साईनाथ थोरात, ओम थोरात, कार्तिक चिंधे व कृष्णा शेरमाळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी ही मागणी केली असून, तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

रानवस्त्यांवर ‘रात्रीच्या वेळी’ वीजपुरवठा सुरू ठेवा!

​गेल्या महिन्यापासून गावठाण परिसरात सायंकाळी सात ते नऊ या वेळेत वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात असला, तरी शेतवस्तीवरील वीजपुरवठा खंडित राहत असल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. यामुळे अंधारात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असून नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धनवाट रस्त्यावरील शेतवस्तीवर सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का? बडा नेत्याच्या ‘टाटा बाय-बाय’ पोस्टने राजकीय चर्चेला...

0
दिल्ली | Delhi उत्तर प्रदेशच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षाचे माजी...