श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीची दि. 22 रोजी तहकूब झालेली सभा काल दि. 25 रोजी सभापती सुधीर नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यातील विषय पत्रिकेतील क्र. 7 आणि 8 या विषयांच्या मंजुरीला उपसभापतींसह तीन संचालकांनी विरोध दर्शविल्याने बाजार समितीची सभा पुन्हा वादग्रस्त ठरली आहे.
याबाबत सभापती सुधीर नवले यांनी दिलेली माहिती अशी की, दि. 22 रोजी आयोजित केलेली सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती. ती सभा काल मंगळवार दि.25 रोजी सायंकाळी 5 वाजता सभापती सुधीर नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यास 18 पैकी 14 संचालक उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व 13 विषयांवर चर्चा होऊन 5 वाजून 20 मिनिटांनी सभा संपली. त्यानंतर उपसभापती अभिषेक खंडागळे, नानासाहेब पवार आणि संचालिका सौ. सरलाबाई बडाख यांचे पती अण्णासाहेब बडाख हे तिघे सभापती नवले यांच्याकडे विषय क्र. 7 व 8 ला विरोध असल्याचा तक्रार अर्ज घेऊन आले.
त्यावर नवले यांनी त्यांना तुम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहुन हा तक्रार अर्ज नोंदवायला पाहिजे होता. मात्र राजकीय दबाव आणून आमच्यापैकी काही संचालकांना चुकीची माहिती दिल्याने ते सभेला हजर न राहिल्याने कोरम अभावी सभा तहकूब करावी लागली. त्यावेळी 6 संचालक उपस्थित होते. परंतु सर्व संचालकांना मी व सचिन गुजर यांनी विरोधकांनी केलेल्या तक्रारी संबंधी कागदपत्रे दाखवून हे राजकीय द्वेषापोटी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे पटवून दिले. त्यानंतर माजी आ. भानुदास मुरकुटे, आ. हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांची बैठक होऊन सर्व संचालक कालच्या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची ग्वाही आपण दिली असल्याचेही नवले यांनी सांगितले.
विरोधक वैफल्यग्रस्त होऊन गेल्या 22 महिन्यांपासून शासकीय पातळीवर कोणत्याही पुराव्याशिवाय तक्रारी तसेच प्रसार माध्यमातून संस्थेची बदनामी करीत आहेत. वास्तविकपणे गेल्या 2 वर्षात काटकसरीने कारभार करुन बँकेत संस्थेच्या 5 कोटींच्या ठेवी केल्या आहेत. सुमारे 4 कोटींची विकास कामे सुरु आहेत. पण ज्यांची संस्थेद्वारे वर्षानुवर्षे चालणारी दुकानदारी बंद झाली तेच काही संचालक दिशाभूल करणारे आरोप करुन सत्तेच्या माध्यमातून संस्थेची बदनामी करुन संचालक मंडळाला अडचणीत आणण्याचे काम करीत आहेत.असेही सभापती नवले यांच्यासह संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, मयुर पटारे, खंडेराव सदाफळ, किशोर बनसोडे यांनी म्हटले असल्याचेही नवले यांनी स्पष्ट केले आहे.