श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जितेंद्र गदिया यांच्याविरोधात माळवाडगाव ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आसने यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची सखोल चौकशी करण्यात आली असून, त्यात गदिया दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी यांनी हा आदेश दिला.
त्यांनी दिलेल्या आदेशात त्यांनी म्हंटले आहे की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र मदनलाल गदिया यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणुक) नियम 2017 नियम 10 (1) (फ) नुसार, बाजार समितीस देणे असलेल्या, बाजार फी, शासनाची सुपरव्हिजन फी रक्कम मुदतीत देण्यात त्यांनी कसूर केलेली असल्याने, नियम 10 (1) (आय) नुसार परवाना नुतनीकरणासाठी मुदतीत अर्ज सादर न करून, मुदतीत बाजार फी, सुपरव्हिजन फी, मापारी कर्मचार्यांचे मानधन मुदतीत अदा न करून, अधिनियम किंवा नियम किंवा त्याखाली केलेले बाजार समितीच्या उपविधीचा एकाहून अधिक वेळा भंग केला आहे.
तसेच नियम 10 (1) (जे) तरतुदीनुसार अधिनियम किंवा नियमाद्वारे आवश्यक केल्याप्रमाणे मापार्याच्या मापाई केल्याच्या रकमा देण्यास कसूर केला असल्याने कसुरदार झालेले आहे. तसेच गदीया यांनी अधिनियम, नियम तसेच बाजारसमितीच्या मंजूर उपविधी मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम 2017 नियम 10 (2) (एक) मधील तरतुदीनुसार व्यापारी परवाना नूतनीकरण केला नाही. त्यांचा परवाना दि. 01 एप्रिल 2024 रोजी खंडित झाल्याने व्यापार्याच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास अपात्र झालेले आहे. श्री. गदिया यांच्याविरोधात माळवाडगाव ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आसने यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची सखोल चौकशी होवून त्यांना अपात्र ठरविण्यात आले.
याअगोदरही मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत स्पष्टपणे सांगितले होते की, जितेंद्र गदिया यांचे आनंद ट्रेडर्स व वैभव ट्रेडर्स या संस्थांच्या नावावर थकबाकी आहे. सार्वजनिक व्यासपीठावर मी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर सत्य समोर आले आणि योग्य ती कारवाई झाली, असे ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब आसने यांनी स्पष्ट केले.
– नानासाहेब आसने, ग्रामपंचायत सदस्य, माळवाडगाव




