श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होऊन आज सहा दिवस झाले आहेत. मतमोजणी 21 तारखेपर्यंत लांबल्याने आता फक्त आणि फक्त चर्चा सुरू आहे. की, कोण निवडून येणार, कोणत्या भागात कोण चालला, कुणी किती पैसे वाटले, मतदारांनी कसे कसे पैसे घेतले आणि पुढे काय होणार.
दररोज समोरासमोर एकमेकाची भेट झाली की, प्रत्येक जण एकमेकाला विचारतोय तुमचा काय अंदाज आहे? आणि मग हा सुद्धा सांगतो – नाही राव, काही सांगता येत नाही, प्रत्येक भागात वेगळा अंदाज येतोय.कुणी म्हणतोय आमच्या भागात कमळ चाललय, कुणी म्हणतो पंजाची हवा आहे. तर कोणी म्हणतंय धनुष्यबाणच निवडून येणार आहे. पण खरी लढत कमळ आणि पंजामध्ये आहे असे म्हणणारे सुद्धा खूप आहेत. त्यामुळे समोरचा ऐकणारा देखील गांगरून जात आहे. एक व्यापारी म्हणतो हवा तर कमळची आहे. तर दुसरा म्हणतो नाही गाव शांत ठेवायचा असेल तर पंजाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदी नेमकं कोण निवडून येणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
आकडेमोड करणार्या काही बहाद्दरांनी मात्र, आपल्या गणिती क्रियेने काँग्रेसचा उमेदवार कसा विजयी होणार याचे मोठे रंजक गणित मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वॉर्ड नंबर दोन मध्ये झालेल्या चार प्रभागातील चौदा हजार मतदानापैकी काँग्रेसच्या उमेदवाराला किमान दहा हजार मते मिळतील आणि उर्वरित 13 प्रभागात काँग्रेसने एक एक हजार मते जरी मिळवली. तरी त्यांची एकूण 23 हजार मते होतात आणि पंजा निवडून येतो. हे गणित ऐकल्यावर भल्या भल्यांचे डोके चक्रावून जात आहे.
दुसरीकडे भाजपाचे कमळ फुलणार यावर अनेक जण ठाम आहेत. मोरगे वस्ती पट्टा, सरस्वती कॉलनी या भागामध्ये कमळाची हवा होती. येथे भाजपा उमेदवाराला मोठा लिड मिळणार आहे. शहरातील व्यापारी वर्गाने कमळाला साथ दिलेली आहे. तसेच मराठा समाजाने देखील कमळाच्या मागे आपली ताकद उभी केली आहे. गोंधवणी परिसरात सुद्धा कमळाचा जोर होता आणि म्हणून 25 हजार मते घेऊन कमळ विजयी होणार असे गणित दमदारपणे मांडले जात आहे.
तिसरी बाजू म्हणजे धनुष्यबाण. धनुष्यबाणाची सुप्त लाट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपुरात सभा घेऊन धनुष्यबाणवाले सर्व गट एकत्र करून सर्वांना कामाला लावलेले होते.त्यामुळे धनुष्यबाणाचे पारडे जड आहे.हिंदुत्वाची सुप्त लाट आहे.त्यामुळे धनुष्यबाणच बाजी मारणार असाही युक्तिवाद केला जात आहे. एकूणच 21 तारखेपर्यंत दररोज नवे नवे अंदाज व्यक्त होणार आहेत. चौका-चौकात गणित बदलत आहे. मतदार मात्र शांत आहे. त्याने कोणाला मतदान केले. हे तो नेमकं खरं सांगत नाहीये. समोरच्या व्यक्तीचा कल पाहून त्याच पक्षाच्या बाजूने मतदार आपले मत व्यक्त करीत आहेत. मात्र स्वतःचे मतदान त्याने कोणाला केले याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही.




