श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील खानापूर येथे कोयता गँगने दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच, आता शहरातील मोरगे वस्ती परिसरात काल मंगळवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास पाच तरुणांच्या टोळक्याने सुमारे सहा ठिकाणी धाडसी चोरी केली. या सहा ठिकाणांहून सुमारे 30 तोळे सोने-चांदीचे दागिने व हजारो रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी चांगदेव त्रिंबक जाधव (वय 63) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 3 मार्च रोजी कुटुंबातील सर्वजण काटे पिंपळगाव (ता. गंगापूर) येथे घरगुती कार्यक्रमासाठी गेलो होतो. जाताना घराचे सर्व दरवाज्यांना कुलूप लावून व मुख्य गेटला देखील कुलूप लावले होते.4 मार्च रोजी पहाटे मुलगा प्रशांत यास आमचे शेजारी रवींद्र मटाले यांनी फोन करून तुमच्या गल्लीमध्ये चोरटे दिसून आल्याचे सांगितले. मुलाने त्याचा फोन कट करुन लगेच गल्लीतील संजय गांगुर्डे यांना फोन करून चोर आल्याचे सांगितले. त्यास तू घराकडे जावून चक्कर मार, असे सांगितले. तो घराकडे गेला असता त्याला, आमच्या घरामध्ये कोणीतरी असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने आरडाओरडा केला, त्यावेळी घरातील चोरटे शेती महामंडळाच्या मोकळ्या रानात अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचे त्याने फोन करून सांगितले.
माझ्या मुलाने घराशेजारीच राहणार्या सरला देवरे यांना फोन करून घरात चोरी झाली काय? याबाबत खात्री करण्यासाठी सांगितले असता त्यांनी पहाणी करुन घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर सकाळी 6 वाजेच्या सुमारास घरी येऊन खात्री केली असता आमच्या घरामध्ये कपाटा मध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने चोरी झाल्याचे दिसून आले. तसेच मोरगे वस्ती परिसरामधील विवेक शाम जाधव, सुशिलाबाई फकीरराव चुळभरे, आसाराम राणु भोजने, विठ्ठल जनार्दन वाघ यांच्या घरातून देखील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याचे त्यांनी मला सांगितले. तसेच सुष्मा लक्ष्मणराव बोकन यांच्या घरी देखील चोरी झाल्याचे समजले.
घरातील कपाटातून 1 लाख 60 हजार रुपयाचे आठ तोळ्याचे सोन्याचे गंठण, 90 हजाराचे साडे चार तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, 1 लाख 60 हजाराचे आठ तोळे वजनाचे दोन सोन्याच्या पोथी, 20 हजाराचे दोन अंगठ्या, 40 हजाराचे दोन तोळ्याचे डोरले व मणी, 10 हजाराचे सोन्याचे कानातील टॉप्स, 14 हजाराचे कानातील वेल, 20 हजाराचे कानातील झुबे, 3 हजाराचे सव्वा दोन ग्रॅम वजनाचे नाकातील सोन्याचे तीन नथ, 3 हजाराचे लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे ओम पान व बाळ्या, एक हजाराचे पाच भार वजनाचे चांदिचे जोडवे, पैंजण व कमरपट्टा या दागिण्यांसह 53 हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी त्रिंबक जाधव यांचा लंपास झाला.
तर 25 हजार रुपये रोख, तीन हजाराचे दोन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत विवेक शाम जाधव यांचे राहत्या घरातून, 10 हजार रुपये रोख सुशिलाबाई फकीरराव चुळभरे यांच्या राहत्या घरातून, पाच हजाराचे रोख रक्कम, एक हजाराचे चांदिचे नाणे आसाराम राणु भोजने यांच्या राहत्या घरातून, आठ हजार रुपये रोख, अर्धा ग्रॅम वजनाचे सोन्याचे चार मणी, तसेच चांदीचा कमरपट्टा, चांदिचा गोळा व पायातील चाळ विठ्ठल जनार्दन वाघ यांच्या राहत्या घरातून असा एकूण 6 लाख 26 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.