श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीचे मतदान पार पाडण्यासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान अधिकार्यांसह 89 मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना झाली आहे. आज मंगळवार दि.2 डिसेंबर रोजी श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुक प्रक्रीया पार पडत आहे. निवडणुक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ, मच्छिंद्र घोलप आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रीया पार पाडीत आहे. शहरात 89 मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष सह एक पोलीस व इतर सहायक असे कर्मचारी तर इतर राखीव असे सुमारे 500 कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. 89 मतदान केंद्रावर 80 हजार 992 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये पुरुष मतदार 39 हजार 936, महिला मतदार संख्या 41 हजार 700 आहे. प्रत्येक मतदाराला तीन मते देण्याचा अधिकार असल्याने मतदानाला वेळ लागणार आहे.
काल दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली. मतदान साहित्य वाटप व जमा करण्यासाठी 17 टेबलचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक टेबलवर मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करण्यात आल्याने विना गोंधळात साहित्य वाटप प्रक्रीया पार पडली. जमा करण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यंत कमी वेळेत साहित्य देवघेव प्रक्रीया पार पडणार आहे. सर्व मतदान केंद्रावर देखरेख करण्यासाठी क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
89 मतदान केंद्रावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 17 प्रभागासाठी 34 नगरसेवक तर 1 नगराध्यक्ष असे प्रतिनिधी निवडून द्यायचे आहे. मतमोजणीसाठी 17 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात चार ते पाच मतदान केंद्र आहेत. त्यामुळे एकाचवेळी 17 टेबलवर 17 प्रभागांची मतमोजणी सुरू राहील. जास्तीत जास्त पाच फेर्यांपर्यंत मतमोजणी चालेल. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.




