श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
प्रशासक राज संपून नवीन पदाधिकारी सत्तेवर आल्यानंतर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात खेळीमेळीत पार पडली. सभेतील सर्व विषय साधक-बाधक चर्चेनंतर सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करण ससाणे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा कांचनताई सानप व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपस्थित होते.
प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व इतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर एक एक विषयावर विषयावर चर्चा झाली. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शहरात बसविण्याबाबत या सभेत चर्चा झाली. सदरचा पुतळा पालिकेच्या खासदार स्व. गोविंदराव आदिक सभागृह समोरील जागेत बसविण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे सादर करण्यात आला. त्यावर नगरसेवक दीपक चव्हाण व वैशाली चव्हाण यांनी हा पुतळा एका बाजूला न बसवता हम रस्त्यावर बसवला पाहिजे येणार्या जाणार्या प्रत्येकाला तो दिसला पाहिजे, अशी मागणी केली तर नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी सदर पुतळा थत्ते ग्राउंडजवळ बसवावा, अशी मागणी केली.
यावर बोलताना नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले की, माझी स्वतःची इच्छा आहे की, शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो बसविता येईल का याचा आपण अभ्यास करावा. विनाकारण वादाचा विषय केल्यास हा विषय लांबेल त्यामुळे सर्वांनी योग्य भूमिका घ्यावी. यासंदर्भात नगरसेवक आशिष धनवटे, संजय गांगड, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे यांनी चर्चेत सहभागी होत जागेबाबत सर्वांगीण अभ्यास करून आदिक सभागृहासमोर पुतळा बसविण्याची जागा योग्य आहे यावर एकमत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला असल्याचे नगराध्यक्ष श्री. ससाणे यांनी सांगितले.
शहरातील अतिक्रमण मोहिमेत विस्थापित झालेल्या लोकांना गाळे व जागा देण्याबाबत शासनाच्या विविध ठिकाणी असलेल्या शासकीय जागांची मागणी केली आहे. या जागा मोफत मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांमार्फत प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले. पाटबंधारे खात्याच्या हद्दीतील जागा पालकमंत्र्यांच्या खात्याअंतर्गत येत असल्याने सदर जागेची मागणी सुद्धा करण्याची ठरले. नगरपालिकेमार्फत घेतल्या जाणार्या विविध व्याख्यानमाला तसेच वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार याबाबत अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार असून त्यानंतर या व्याख्यानमाला चालू करण्यात येतील, असे सांगण्यात आले. माजी आ. स्व.जयंतराव ससाणे यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करण्याची मागणी नगरसेविका प्रणिती चव्हाण यांनी केली. तर माजी खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करण्याची मागणी दीपक चव्हाण व वैशाली चव्हाण यांनी केली.
तसेच वसंतराव देशमुख पुरस्कारासोबतच पत्रकार अशोक तुपे यांच्या नावाने पुरस्कार देण्याची मागणी प्रणिती चव्हाण यांनी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष स्व. अनिल कांबळे यांचे तैलचित्र अनावरण करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. शहरातील पंडित नेहरू उद्यान नूतनीकरण करून नमो उद्यान योजनेअंतर्गत त्या ठिकाणी एक कोटी रुपयाचे भव्य असे उद्यान विकसित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा योजनेला मुदतवाढ देतानाच शहराला स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे. श्रीनिवास बिहाणी यांनी मोरगे वस्तीवरील दूषित पाण्याच्या प्रश्न चर्चेला घेतला. पाण्याचे रोटेशन येण्यापूर्वी कॅनालची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी स्नेहल खोरे यांनी केली.
शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंगरोड होणे गरजेचे असून शहराच्या चारी बाजूने असलेल्या रिंग रोडचे काम करण्यासाठी मोठा निधी लागत असल्याने सदरचा रिंग रोड हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पालकमंत्र्यांमार्फत प्रयत्न करण्याचे ठरले. रिंग रोड काढताना सध्या असलेली अतिक्रमणे पुनर्वसित करण्यात यावी, असे श्री. बिहाणी यांनी सांगितले. कचरा गाड्यांच्या प्रश्नावर देखील जोरदार चर्चा होऊन कचर्याचे ठेकेदार बदलण्याबाबत सर्वच नगरसेवकांनी मागणी केली. लोकमान्य टिळक वाचनालयातील ई लायब्ररी विकसित करण्याचे घोषित करण्यात आले. बिबट्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन पिंजरे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स निर्माण करण्याबाबत नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
कॅनल साईडला असलेल्या दोन्ही जॉगिंग ट्रॅकला डॉ. कुमार चोथाणी व माजी आ.स्व. जयंतराव ससाणे यांचे नाव द्यावे, अशी सूचना मुजफ्फर शेख यांनी केली ती मान्य करण्यात आली. शहरात एकल महिलांचा सर्र्व्हेे पुन्हा करण्यात यावा व त्यांच्यासाठी शासनाच्या योजनाचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी मान्य करण्यात आली. शहरातील अंगणवाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी शिक्षण समितीचे सभापती राजेंद्र पवार यांनी केली. सभेत सत्ताधारी गटाच्यावतीने गटनेते मुजफ्फर शेख, अंजुम शेख, दिलीप नागरे, मंजुश्री मुरकुटे, संतोष कांबळे, राजेंद्र पवार, प्रणिती चव्हाण, डॉ. दिलीप शिरसाठ यांनी तर विरोधी भाजपातर्फे गटनेत्या वैशाली चव्हाण, दीपक चव्हाण, श्रीनिवास बिहाणी, आशिष धनवटे, संजय गांगड, आकाश बेग, जितेंद्र छाजेड, स्नेहल खोरे आदी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला.
पाणीपुरवठा योजनेबाबत चर्चा करताना शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शनची तपासणी करून अशा नळ कनेक्शन धारकांना एक महिन्याची नोटीस देऊन त्यांनी आपले कनेक्शन नियमित करून घ्यावे. त्यासाठी पाच हजार रुपये शास्ती भरावी असे सांगून जे नळ कनेक्शनधारक याबाबत प्रतिसाद देणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जाहीर केले.





