श्रीरामपूर (प्रतिनिधी)
तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबीयांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेत असून या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्ण दहशतीखाली आहे. या घटनेचा तातडीने तपास लावून पुजारी कुटुंबीयांची भीती घालवावी, अशी मागणी सरपंच प्रणाली भगत, उपसरपंच अॅड. दीपक बारहाते यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसांपूर्वी दगडे येत होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला त्यानंतर दगडे येणे बंद झाले. मात्र, काल अचानक त्यांच्या घरातील गादी, उशी, प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या. काल सायंकाळी साडेचार वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीने आपोआप पेट घेतला. थोड्या वेळात किचन रूम मधील वस्तू जळाल्या. या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले. त्यांनी तातडीने आपल्या वस्तू शेजारच्या घरात नेऊन ठेवल्या.
काल सकाळी त्यांनी घरातील पूर्ण सामान बाहेर आणून ठेवले व काही वस्तू शेजाऱ्यांच्या घरात ठेवल्या. त्यानंतर काही वेळातच ग्रामस्थां समक्ष त्या वस्तूंनी पेट घेतला. त्यामुळे ग्रामस्थ देखील अचंबित झाले. ही घटना समजताच श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व बेलापूर औट पोस्टचे सहायक पोलीस उपनिरिक्षक, सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, नंदू लोखंडे, भारत तमनर संपत बडे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर अनाप, अनिसंचे जुने कार्यकर्ते देविदास देसाई आदींनी घटनास्थळी भेट दिली व पुजारी कुटुंबीयांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करून या घटनेमागे असलेले कारण निश्चितच शोधून काढू असे आश्वासन पुजारी कुटुंबीयांना दिले. ही घटना पाहण्याकरता आसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले होते.
विज्ञान सांगते कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही. त्यामागे कोणाचा काहीतरी हेतू असतो. त्यामुळे पुजारी कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नये, हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धा पसरविणे व पुजारी कुटुंबीयांना घाबरवणे हाच हेतू असावा. असे मत अनिसं कार्यकर्ते देविदास देसाई यांनी व्यक्त केले आहे.