Sunday, February 9, 2025
Homeनगरश्रीरामपूर-परळी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाला मंजुरी कधी मिळणार

श्रीरामपूर-परळी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाला मंजुरी कधी मिळणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर परळी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाला येत्या अधिवेशनात मंजुरी मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 104 वर्ष प्रलंबित या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल जून 2022 मध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी गेलेला आहे, त्यामुळे येत्या बजेटमध्ये या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळेल, असे वाटत होते. मात्र, नेहमीच्याप्रमाणे वाटच पाहावी लागणार, त्यासाठी मंजुरी कधी मिळणार? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी या रेल्वे मार्गाचा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता. या रेल्वे मार्गामुळे श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-माजलगाव-परळी या तालुक्यांसह अहिल्यानगर व बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. ब्रिटिशांनी सन 1922 मध्ये मार्गाला मंजुरी दिली होती.

- Advertisement -

त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहण करून त्यावर माती भरावही केला होता. स्वातंत्र्यानंतर हा रेल्वे मार्ग दुर्लक्षित झाला. खा. भाऊसाहेब वाकचौरे नगर दक्षिणचे तत्कालीन खासदार स्व. दिलीप गांधी यांनी या रेल्वे मार्गासाठी लढा व पाठपुरावा सुरू ठेवला होता, परंतु 2014 ते 2024 या कालावधीत केंद्राकडे या रेल्वे मार्गासाठी कुठलाही पाठपुरावा झाला नाही. 2024 च्या निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खा. भाऊसाहेब वाकचौरे यांची वर्णी लागल्याने जनतेने पुन्हा श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वाचा जोर धरला आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाकडे नेवासाचे तत्कालीन आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी पाठपुरावा करून या रेल्वे मार्गासाठी 50 टक्के राज्य शासनाचा सहभाग मंजूर करून घेतलेला आहे. या मंजुरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये दिलेले आहे.

या रेल्वे मार्गासाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे 2017 व 2018 या कालावधीत आमरण उपोषणे, मंत्रालय मुंबई येथे आत्मदहन आंदोलन करण्यात आलेले आहे. हा रेल्वे मार्ग तातडीने सुरू करावा, यासाठी ऑक्टोबर 2022 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर बैठकीचे नियोजन करण्याचे आदेश असूनही गेल्या दोन वर्षांत एकही बैठक झालेली नाही. आ. विठ्ठलराव लंघे व खा. निलेश लंके हे या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार का? याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून बघितलेले स्वप्न कधी पूर्ण होणार असाही सवाल जनतेतून विचारला जात आहे.

गेल्या सोळा वर्षांपासून या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्र्यांसह या रेल्वे मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी व सेवा संस्थांची बैठक आयोजित करणे गरजेचे आहे.
– रितेश भंडारी (सचिव) बेलापूर परळी, रेल्वे प्रवासी सेवा संस्था

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या