श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सेवेत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सचिन रुपचंद दुकळे हे छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी एसटी बसने जात असताना दोघांनी त्यांची मोटारसायकल बसला आडवी लावून बस थांबून श्री दुकळे यांना बसमधून खाली उतरवून संभाजीनगरला गुन्ह्याचे कागदपत्र जमा करायला कसा जातो तेच पाहतो असे बोलून शासकीय कामात अडथळा आणून धक्काबुक्की, शिवीगाळ दमदाटी करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संकेत राजनाथ यादव, सर्वेश राजनाथ यादव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन रुपचंद दुकळे हे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं 1028/2024 भा.न्या.सं क 119(1) वगैरे दाखल गुन्ह्यातील वरिष्ठाच्या आदेशाने उच्च न्यायालयाकडील बेल अॅप्लिकेशन नं. 525/2025 चे कागदपत्रे व म्हणणे देण्यासाठी शासकीय गणवेशात छत्रपती संभाजीनगर येथे जाणारी बस पकडण्यासाठी श्रीरामपूर बसस्थानक येथे गेले होते. ते बसची वाट बघत उभे असताना त्यांना पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल राहुल पौळ हे भेटले. त्यांनाही नेवासा येथे जायचे होते. सुमारे 09.30 च्या सुमारास श्रीरामपूर बस स्थानकात शिर्डी-छत्रपती संभाजीनगर येथे जाणारी बस आली व बसमधील प्रवासी खाली उतरले असता त्यातील शेवटचा एक अनोळखी प्रवासी हा बस दरवाजाच्या शेवटच्या पायरीवर आला व त्याने दरवाजाला हात आडवा लावून उभा राहीला व पोलीस दुकळे बसमध्ये चढत असताना त्याने त्यांना धक्का देवून बाजुला लोटले तेव्हा दुकळे त्याला बोलले तु एकटाच राहीला आहे.
मला वर चढू दे तेव्हा त्याने पोलीस दुकळे यांच्या शर्टाची गच्ची धरून त्यांना बसच्या खाली लोटले. तेव्हा त्यांना पोकॉ/राहुल पौळ यांनी आधार दिला व आम्ही पोलीस असून मला उच्च न्यायालय खंडपीठ येथे शासकीय कामासाठी जायचे आहे. मला जाऊ दे असे त्यास सांगितले. सदर व्यक्तीने यावेळी शिवीगाळ करून वाद घातला. तेव्हा इतर प्रवाशांनी त्या अनोळखी प्रवासी इसमाला त्या ठिकाणाहून काढून दिले व सगळे बसमध्ये बसले. ही बस नेवासा रोडवरील पाटणी विद्यालयासमोर आली असता बस चालकाने अचानक ब्रेक दाबले व बस थांबली. दोन इसमांनी बसला गाडी आडवी लावली. बस स्थानकात हुज्जत घातलेला व पोलीस दुकळे यांना धक्काबुक्की केलेला अनोळखी इसम तसेच त्याच्यासोबत आणखी एक अनोळखी इसम हे बसमध्ये चढले व पोलीस कॉन्स्टेबल दुकळे यांना बळजबरीने बसमधून खाली उतरवले.
तेव्हा त्यांच्याबरोबर असलेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल पौळ हे पण खाली उतरले. तु संभाजीनगरला गुन्ह्याचे कागदपत्र जमा करायला कसा जातो तेच पाहतो असे बोलून शासकीय कामात अडथळा आणत दुकळे यांना धक्काबुक्की, शिविगाळ दमदाटी करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सचिन रुपचंद दुकळे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संकेत राजनाथ यादव, सर्वेश राजनाथ यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.