Friday, May 17, 2024
Homeनगरश्रीरामपुरात पोलिसांवर दगडफेक

श्रीरामपुरात पोलिसांवर दगडफेक

दोन कर्मचारी जखमी; शिवाजी महाराज चौकातील घटना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर शहरात आयोजित काझीबाबा संदल मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवरच दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या या घटनेमुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

पोलीस कर्मचार्‍यांवरच मिरवणुकीतून दगडफेक करण्याचा प्रकार घडला. या दगडफेकीमुळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर (नेमणूक मुख्यालय अहमदनगर) यांच्या कानाजवळ दगड लागला असून दोन टाके पडले आहेत. तसेच श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे श्री. चौधरी हेही जखमी झाले आहेत. दगडफेकीची घटना झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सदर घटनेची बातमी काही क्षणात शहरांमध्ये वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे या चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग जमा झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची गर्दी पांगवली. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. यातील जखमी पोलीस कर्मचार्‍यांना प्राथमिक उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मागील वर्षी देखील याच मिरवणुकीमध्ये डिजेवर चिथावणीखोर गाणे लावल्याने तणाव निर्माण झाला होता. याही वर्षी दगडफेक झाल्याने हा प्रकार घडल्याने पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी. तसेच गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

मिरवणुकीतून घोषणाबाजी

दगडफेकीची घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण आणले, त्यामुळे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतू काही वेळाने मिरवणुकीतून विशिष्ट प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या. झेंडे फडकवण्याचा प्रकार घडला. त्यामुळे या घोषणा कुणी दिल्या याचाही पोलीस प्रशासनाने शोध घ्यावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या