श्रीरामपूर । प्रतिनिधी
शहर परिसरात शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सरफराज बाबा शेख असे या आरोपीचे नाव असून, त्याची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ज्या भागात त्याने धुमाकूळ घातला होता, त्याच भागात त्याची धिंड काढली. या कारवाईमुळे श्रीरामपूरमधील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.
२२ मार्च २०२६ रोजी सरफराज शेख हा श्रीरामपूरमधील वॉर्ड नंबर २ येथील बीफ मार्केट परिसरात हातात गावठी कट्टा घेऊन लोकांना धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली असता, सरफराज तेथे दहशत माजवत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच तो तेथून पसार झाला होता. पोलिसांनी कसून शोध घेतला असता तो वॉर्ड नंबर १ मधील ईदगाह मैदान परिसरात मिळून आला. त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम (सुधारणा) २०१९ च्या विविध कलमांनुसार गुन्हा (गु.र. नंबर २०७/२०२६) दाखल करण्यात आला आहे. सरफराज शेख हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, याच आरोपीविरुद्ध खंडणीचाही एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. साबीर शब्बीर कुरेशी या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तो आपल्या कारने बीफ मार्केटमधून जात असताना सरफराज शेख आणि त्याच्या साथीदारांनी (इरफान मैनुद्दीन शेख, लुकमान इसाक शहा, राहुल सोनवणे) त्याला अडवले. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून साबीरकडे ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
साबीरने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी इरफान शेख याने त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने साबीरने तो वार चुकवला, मात्र इतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. साबीरने तेथून कारसह पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०९, १८९(२), ३०८(२) आणि १२६(२) अन्वये दुसरा गुन्हा (गु.र. नंबर २०८/२०२६) दाखल केला आहे.
गुन्हेगारांमधील कायद्याचा धाक संपत चालल्याचे पाहून पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. सरफराज शेखची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याची परिसरातून धिंड काढली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या ‘खाक्या’मुळे आरोपीला चालतानाही त्रास होत असल्याचे दिसून आले, ज्याची चर्चा परिसरात रंगली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत असून, शहरात शांतता राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





