श्रीरामपूर |वार्ताहर| Shrirampur
उत्तरप्रदेशमध्ये काल घडलेल्या घटनेचा श्रीरामपूर काँग्रेसकडून आ. लहू कानडे व युवा नेते करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली कँडलमार्च काढून निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा यासाठी व देशाचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी हे त्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी जात असताना उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करून अटक केली या घटनेचा आम्ही निषेध करतो. देशात सध्या लोकशाही पायदळी तुडवत हुकूमशाही कारभार चालू असल्याची टीका ससाणे यांनी केली आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले, देशाच्या जडण घडणीत गांधी कुटुंबाचे मोठे बलिदान आहे. ज्या कुटुंंबातील सदस्यांनी देशासाठी अंगावर गोळ्या झेलत आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना या धक्काबुक्कीची काय भीती असणार असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी उत्तरप्रदेश मधील योगी सरकारचा निषेध व्यक्त केला. ज्या पद्धतीने पीडित मुलीची व तिच्या कुटुंबियांची हेळसांड केली त्यांना जनता कदापी माफ करणार नाही आमचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यावर हल्ला करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे , परंतु अशा भ्याड हल्ल्यांना काँग्रेस कदापी भीक घालणार नसल्याचं म्हटले आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, शहराध्यक्ष संजय छल्लारे, जिल्हा काँग्रेसचे सुभाष तोरणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिध्दार्थ फड, नगरसेवक मनोज लबडे, रितेश रोटे पाटील, समीन बागवान, सेवादल काँग्रेसचे रावसाहेब आल्हाट, रियाज पठाण, प्रवीण नवले, जफर शहा, गोपाल लिंगायत, मनीष पंचमुख, सनी मंडलिक, प्रताप गुजर, योगेश बडघे आदी उपस्थित होते.