श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
रेल्वे मालधक्क्यामुळे तसेच आलेल्या नोटिसांमुळे श्रीरामपूरमधील कोणीही बेघर होणार नाही, यासाठी निश्चित मार्ग काढण्यात येईल. याप्रश्नी मी श्रीरामपूरकरांसोबत आहे, अशी ग्वाही देत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी धास्तावलेल्या श्रीरामपूरकरांना शनिवारी मोठा दिलासा दिला.
रेल्वे प्रशासनाने श्रीरामपूरमधील रेल्वे मार्गालगत असलेल्या घरमालकांना तसेच नियोजित मालधक्क्यासाठी जागा संपादित करण्यासाठी 1500 घरमालकांना नोटिसा बजावून जागा रिकाम्या करण्यास सांगितले होते. या नोटिसांमुळे बेघर व्हावे लागण्याच्या भितीने रेल्वे मार्गालगतचे घरमालक, रहिवाशी धास्तावले होते. तसेच रेल्वे मालधक्का नेवासा रस्त्यावर हलविण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यवाही सुरू झाली होती. या नियोजित मालधक्क्यावर सिमेंट उतरवले जात असल्यामुळे त्याची धूळ परिसरात पसरून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊन दमा व इतर व्याधी निर्माण होत आहेत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला या मालधक्क्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच या प्रस्तावित मालधक्क्यामुळे 175 कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार आहे. या कारणांमुळे हा मालधक्का नेवासा रस्त्याऐवजी श्रीरामपूर शहरातच असलेल्या जागेपासून शहराबाहेर हलविण्याची मागणी परिसरातील नागरिकांची होती.
तर गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाधिकारी, नगरपालिका, महसूल विभाग, नगररचना विभाग यांची रितसर परवानगी घेऊन नागरिकांनी पक्की बांधकामे करून घरे, बंगले, इमारती रेल्वे मार्गापासून काही अंतरावर बांधलेली आहेत. या जागामालकांना देखील रेल्वे प्रशासनाने नोटिसा देऊन या जागेवर आपली मालकी सांगत ही जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या जागामालकांचे व मालधक्क्यामुळे विस्थापित व्हावे लागणार्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत ‘घर बचाव संघर्ष समिती’ व इतर माध्यमातून मोर्चा काढून अधिकार्यांना निवेदन देखील दिले होते.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी नागरिकांच्या भावनांची दखल घेऊन याबाबत रेल्वे महसूल व इतर संबंधित अधिकार्यांची श्रीरामपूर नगरपालिकेत बैठक देखील घेतली होती. या बैठकीत मार्ग न निघाल्यामुळे त्यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान ‘घर बचाव संघर्ष समिती’चे अध्यक्ष अशोक बागुल, कार्याध्यक्ष मुख्तार शहा, भाजपचे शहराध्यक्ष मारूती बिंगले, गणेश राठी, उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, रियाजखान पठाण यांच्यासह नागेश सावंत, तिलक डुंगरवाल, संजय गांगड व मालधक्का परिसरातील बाधित नागरिकांनी पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना निवेदन देऊन रेल्वे प्रश्न तोडगा काढण्याची विनंती केली केली होती. याची दखल घेत पालकमंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याशी शुक्रवारी रात्री भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून श्रीरामपूर मधील रेल्वे प्रश्नाची माहिती देऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती.
त्यानुसार शनिवारी दुपारी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी भाजपचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, विजय आखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष रुपेश हरकल, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष मंजुषा ढोकचौळे, शहराध्यक्ष पूजा चव्हाण, बंडुकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाधित नागरिकांचे शिष्टमंडळ गेले होते. यावेळी राज्यमंत्री दानवे यांच्यासमोर घर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक बागुल, कामगार नेते नागेश सावंत, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सचिन बडदे यांनी वस्तुस्थिती मांडली. भाजपचे नितीन दिनकर दीपक पटारे यांनीही रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नोटिसांचा प्रश्न व मालधक्का प्रकरणी मार्ग काढण्याची विनंती दानवे यांना करून निवेदन दिले.
त्यावर दानवे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विभागीय व्यवस्थापक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर मालधक्का शहराच्या मध्यभागी असल्यामुळे वायु प्रदूषण व इतर प्रश्न निर्माण होत असल्यास मालधक्का शहरा लगतच इतरत्र हलविला जाईल. तसेच जिल्हाधिकारी महसूल विभागाची परवानगी व मालकीचे महसुली पुरावे असतानाही नोटिसा आलेल्या नागरिकांना विस्थापित होऊ दिले जाणार नाही, असे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले.
याप्रसंगी नागेश सावंत, सचिन बडदे, तिलक डुंगरवाल, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, अशोक बागुल, मुख्तार शहा, संजय गांगड, नाना गांगड, किरण बोरावके, डॉ. वर्षा शिरसाठ, डॉ. भालेराव, प्रवीण जोजारे यांच्यासह नोटिसाबाधित महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री दानवे घेणार मुंबईत बैठक
याबाबत महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह रेल्वे महसूल व इतर संबंधित विभागांच्या अधिकार्यांसमवेत मुंबईत लवकरच एक बैठक आयोजित करून श्रीरामपूर मधील रेल्वेच्या जागेच्या मालकीबाबत पुरावे शोधून तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी श्रीरामपूरच्या शिष्टमंडळाला दिली. त्यामुळे रेल्वेने नोटिसा दिलेल्या तसेच नियोजित माल धक्क्यामुळे विस्थापित होऊ घातलेल्या श्रीरामपूर मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.