Wednesday, February 4, 2026
Homeनगरश्रीरामपूरच्या पूर्व भागात रिमझिम पावसावर खरीप पिके जोमात

श्रीरामपूरच्या पूर्व भागात रिमझिम पावसावर खरीप पिके जोमात

चालू महिन्यातील उत्तरा अन् हस्त नक्षत्रावर रब्बीचे भवितव्य अवलंबून

माळवाडगाव | Malvadgav

यार्षीच्या पावसाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणे तुडूंब भरली, त्यामुळे प्रवरा, गोदावरी व मुळा दुथडी वाहत्या झाल्या, श्रीरामपूर तालुका पुर्व परिसरात पहिल्या मृग नक्षत्रापासून तर पुर्वा नक्षत्रापर्यतच्या सात नक्षत्रात रिमझिम पावसात खरीप पिकांना जीवदान मिळाले. मात्र, एकही जोरदार पाऊस झाला नाही, किंवा शेतातून अथवा ओढे नाल्यांमधून पाणी वाहीले नाही, त्यामुळे पुढील रब्बी पिकांचे भवितव्य उर्वरीत उत्तरा, हस्त नक्षत्रावर अवलंबुन आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील एकुण पाच महसूल मंडलापैकी श्रीरामपूर, बेलापूर, कारेगाव या तीन मंडलाच्या अखत्यारितील प्रवरेवरील बंधारे, नदिकाठची गावे व अन्य गावे भंडारदरा धरण लाभक्षेत्रात येतात. पुर्व गोदाकाठ परिसरातील उंदिरगाव, टाकळीभान महसूल मंडलात 40 टक्के क्षेत्र अद्याप जिरायत असून पावसावर अवलंबून आहे. यावर्षी मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसासारखा एकही मोठा पाऊस अद्याप पडलेला नाही. 8 जुन रोजी मृग नक्षत्रास मध्यम पावसाने सुरूवात होऊन, दुसर्‍या आठवड्यात 10 ते 15 जुन दरम्यान खरीपातील कापुस, सोयाबीन, मका आदी पिकांची पेरणी पुर्ण झाली. 22 जुनला सुरू झालेले आद्रा नक्षत्र कोरडेच गेल्यानंतर, खरीपाची पिके सुकू लागली असताना 5 जुलै रोजी सुरू झालेल्या पुनर्वसु नक्षात्रील रिमझीम पावसाने खरिप पिके पुन्हा बहरली.

YouTube video player

पुढे 19 जुलैस सुरू झालेल्या पुष्य नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने जेमतेम हजेरी लावून बळीराजाला आधार दिला. मात्र, 2 ऑगष्टला सुरू झालेले आश्लेषा नक्षत्राने योगीराज सद्गुरू गंगगागिरी महाराज 178 व्या सप्ताह समाप्ती नंतर शेवटचे चार दिवस समाधानकारक हजेरी लावली. 16 ऑगष्ट रोजी सुरू झालेल्या मघा नक्षत्र कोरडेच गेले. गणेशोत्सवात 30 ऑगष्ट पासून प्रारंभ झालेल्या पुर्वा नक्षत्रात डोक्यावर काळेकुट्ट ढग असतानाही अधून मधून हलक्याशा सरी सुरू आहेत.

भंडारदरा ओव्हरफ्लो आवर्तनात टाकळीभान टेलटॅक व मुठेवाडगाव पाझर तलाव भरल्यानंतर ओढ्या नाल्यावरील जि. प. व अशोक बंधारे तुडूंब भरण्यात आले. जोरदार पाऊस होऊन बांद-बंधार्‍यातून पाणी बाहेर पडले नसल्याने बागायत सुरू ऊस लागवडीची वाढ समाधानकारक झालेली नाही. खरीपातील कापुस वाढ कमी तर सोयाबीन पीकास वेळेवर सलाईन प्रमाणे रिमझीम पाऊस सुरू असल्याने बहुतांश ठिकाणी कुठे गुडघ्याला तर कुठे कमरेपर्यत सोयाबीनची वाढ झालेली दिसून येते. वाढ झालेल्या सोयाबीनच्या वेगवेगळ्या व्हरायटीस प्रथमच शेंड्यापर्यत भरीव शेंगा असल्याने विक्रमी ऊत्पादन होण्याची शक्यता आहे. शेजारच्या वैजापूर, गंगापूर तालुक्याच्या तुलनेत मका पीक क्षेत्र कमी असून त्याचीही मुरघास बॅग भरण्यासाठी कापणी सुरू आहे.

अडीच महिन्यात सातवे नक्षत्र सुरू असतानाही जोरदार पाऊस नसल्याने जमिनीचा अद्याप भुसभुशीत पोत आहे. जमिनीतील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी व पुढील शाश्वत रब्बी पीके घेण्यासाठी दि. 13 सप्टेबर रोजी सुरू होणार्‍या उत्तरा व 27 सप्टेबरला लागणार्‍या हस्त नक्षत्र या दोन नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडला तर रब्बी हंगाम चांगला होण्याची शक्यता आहे.

तीन महिन्यात सरासरीच्या 50 टक्के नोंद
श्रीरामपूर तालुक्यात दरवर्षी सरासरी 21 ते 22 इंच म्हणजे 500 ते 550 मी.मी. पावसाची नोंद होत असते. परंतू यावर्षी पावसाळा सुरू होऊन तीन महीने उलटले तरी, सरासरी 50 टक्केच पावसाची नोंद झालेली आहे. जलसंपदा विभागाच्या श्रीरामपूर कार्यालयात आज अखेर 262 मी.मी. (10 इंच), वडाळा महादेव बंगल्यात 286 मी.मी. (11 इंच) अशी अधिकृत नोंद झालेली आहे. पुर्व परिसरात मातापूर, खोकर, निपाणी वाडगाव, वडाळा महादेव पंचक्रोशीत आतापर्यंत तीन ते चार पाऊस जादा झाल्याने वडाळा महादेव जलसंपदा कार्यालयातील नोंद जादा आहे. मात्र, खोकरफाट्यापासून पुढील गावात पावसाचे प्रमाण सरासरी 200 मी.मी. म्हणजेच 8 इंच ईतकी नोंद खासगी पर्जन्यमापकावर आहे.

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...