श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील एका साखर व्यापार्याची सुमारे एक कोटी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात साजन शुगरचे अध्यक्ष साजन सदाशिव पाचपुते यांच्यासह सर्व संचालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अनेक व्यापारी जिल्ह्यासह राज्यात साखर कारखान्यांना माल पुरविणे, तसेच इतर खरेदी-विक्रीचे व्यवसाय करतात. शहरातील साखर व तेलाचे व्यापारी राजेश रुपचंद कासलीवाल (रा.श्रीरामपूर) यांची या व्यवहारात 1 कोटी 24 लाख 77 हजार 390 रुपयांची फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, सन 2022 मध्ये साजन पाचपुते यांच्याशी साखर खरेदीचा करार केला होता. परंतू करारामध्ये ठरल्याप्रमाणे संचालक मंडळाने आम्हाला साखर दिली नाही. 93 लाख रुपये घेवून साखर न देता फसवणूक करून करार भंग केला. त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता 34 लाख 62 हजाराचा भिमालयनगर, पुणे येथील फ्लॅट नावे केला. राहिलेली रक्कम 58 लाख 38 हजार व करारात ठरल्या प्रमाणे 66 लाख 39 हजार 390 अशी एकूण 1 कोटीची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी राजेश कासलीवाल यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या दिल्यावरून साजन सदाशिव पाचपुते (चेअरमन साजन शुगर प्रा. लि. काष्टी, श्रीगोंदा) यांच्यासह संचालक मंडळा विरुद्ध भा. न्या. सहिंता 2023 चे कलन 318 (4), 316(5), 316 (2), 3(5) प्रमाणे फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील साजन सदाशिव पाचपुते यांना श्रीरामपूर न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. दि. 6 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचे कामकाज अॅड. मुकुंद गवारे यांनी पाहिले. त्यांना अॅड. एस. एस. शेख, एस. एस. पठाण यांनी सहकार्य केले.