Saturday, July 27, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात अवघी 21 टक्के पेरणी

श्रीरामपूर तालुक्यात अवघी 21 टक्के पेरणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यात अजूनही पेरणी योग्य पाऊस नसल्याने खरिपातील पेरण्या रखडल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यात अद्यापपर्यंत अवघी 21 टक्के पेरणी झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पीक पेरणीस उशिर होत असून कमी अधिक ओलीवर पेरणी केलेल्या पिकांनाही सध्या पावसाची नितांत गरज आहे. तालुक्यात खरिपाच्या 26 हजार 300 हेक्टर उद्दिष्टापैकी फक्त 5 हजार 307 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

- Advertisement -

जून महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यातील खरीप पेरणी रखडली होती. शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीचे काम उरकून खते, बियाणे खरेदी केली. मात्र जून महिन्यात पेरणी योग्य पाऊस पडला नाही. जुलै महिनाही अर्ध्यावर संपत आला तरी देखील तालुक्याचा काही भाग वगळता पेरणीची कामे खोळंबलेली आहेत. त्यातच कृषी विभागाने दि. 15 जुलै पर्यंत सोयाबीनची पेरणी करा, असे सांगितले असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे. त्यामुळे आता वेळेवर पाऊस पडला नाही तर खरिपातील संपूर्ण पिकांचे नियोजन शेतकर्‍यांना बदलावे लागणार अशीच काहीशी स्थिती सध्या तरी तालुक्यात दिसू लागली आहे.

कृषी विभागाकडून चालू खरीप हंगामात 26 हजार 300 हेक्टरवर उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अद्यापर्यंत फक्त 5 हजार 307 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन 1158 हेक्टर, कपाशी 1601 हेक्टर, मका 282 हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन यांनी दिली आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात तालुक्याच्या काही भागात आर्द्रा नक्षत्राने हजेरी लावली. मात्र तो पाऊसही सर्वदूर नसल्याने पेरणीयोग्य ओल झाली नाही. तरी देखील काही शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र आता या पिकांनाही पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे त्या शेतकर्‍यांचीही चिंता वाढली आहे. तर ज्या शेतकर्‍यांकडे पाणी उपलब्ध आहे. त्यांनी तुषार सिंचनाचा वापर करुन सोयाबीनला पाणी देण्यास सुरूवात केली आहे. तर कपाशी, मका, ऊस यासारख्या पिकांनाही सध्या पाण्याची गरज आहे.

चालू खरीप हंगामात सोयाबीन पेरणीसाठी सुमारे 16 हजार 100 हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र गृहित धरले आहे. शेतकर्‍यांच्यादृष्टीनेही खरिपात सोयाबीन मुख्य पीक मानले जाते. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पेरणी धोक्यात येते की काय? असेच काहीसे चित्र सध्या तरी दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या