वाहन सुरक्षा आली धोक्यात; नागरिक धास्तावले; पोलिसांनी दुचाकी चोरांचा तपास करणे गरजेचे
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर व तालुक्याला चोर्या, रस्ता लूट, गंठणचोरी या घटना नवख्या नाहीत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर शहरासह तालुकाभरात दुचाकी चोरीचे लोन पसरले आहे. पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही चोरी गेलेल्या दुचाकींचा तपास लागण्याचे प्रमाण नगण्यच आहे. त्यामुळे चोरी गेलेल्या दुचाकी मिळण्याची आशा धूसर बनत चालली आहे. एकंदरितच वाढत्या दुचाकी चोर्यांमुळे शहर व तालुक्यात दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट असून बाहेरील तालुक्यांतील गुन्हेगारांचेही येथे कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहर व तालुका पोलिसांसमोर दुचाकी चोरांचा तपास करणे हे आव्हानच ठरले असून सध्या तरी तालुक्यात वाहन सुरक्षा ‘धोक्यात’ आल्याचे दिसत आहे.
मागील काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील मंगल कार्यालये, गर्दीची ठिकाणे, आठवडे बाजार, हॉस्पिटल, रस्त्याच्याकडेला पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी सर्रासपणे चोरीस जात आहेत. तर दुचाकी चोरांनी आता शहराबरोबर ग्रामीण भागालाही लक्ष्य केले आहे. ग्रामीण भाग सीसीटीव्ही कॅमेर्यापासून अद्यापही कोसोदूर आहे. त्यामुळे याठिकाणी दुचाकी चोरी करणे चोरट्यांना सुरक्षेचे वाटते. त्यामुळे ग्रामीण भागात घरासमोरून, रस्त्याच्याकडेला, शेती परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी हॅण्डेल लॉक, टायरचे लॉक तोडून चोरीस जात आहेत. त्यामुळे आता वाहनांची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे जाणवत आहे.
दुचाकी चोरी झाल्यानंतर अनेक नागरिक तक्रार दाखल करण्याबाबत टाळाटाळ करतात. पर्यायाने संबंधित गुन्ह्याचा तपास लागत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचेही फावत आहे. तर पोलिसांनाही दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत असल्याने यापूर्वी दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या अनेक घटनांचा तपास प्रलंबित आहे. त्यामुळे चोरीस गेलेल्या दुचाकी परत मिळण्याची आशा मावळली आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातून चोरीस गेलेल्या गाड्या बाहेरील तालुक्यात मिळून आल्या. त्यामुळे दुचाकी चोरीचे धागेदोरे बाहेरील तालुक्यांत गुरफटल्याचे प्रत्ययास येते.
चोरी गेलेल्या दुचाकीची संबंधित व्यक्तींकडून गाडीची कागदपत्रे न बघता नंबर प्लेट बदलली जाते, महागड्या साहित्याची भंगारमध्ये विक्री केली जाते तर काही वेळेस दुचाकी बेवारस रस्त्याच्याकडेला टाकून दिल्या जातात. काही दुचाकी पोलीस तपासात मिळूनही येतात. मात्र त्या दुचाकींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असते. एकंदरीतच दुचाकी चोरीचे शहर व तालुक्यात जाळे पसरत आहे. पोलिसांनाही दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत असल्याने वाहन चालक धास्तावले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने दुचाकी चोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांचा निम्मा जीव गाडीकडेच
शहरात तसेच ग्रामीण भागात विविध समारंभ, उत्सव, लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशाच ठिकाणाहून दुचाकी चोरी जाण्याची शक्यता असते.मात्र यातील अनेक ठिकाणी सुरक्षित पार्किंगची सुविधा नसल्याने वाहन पार्किंग करताना अडचणी निर्माण होतात. अशावेळी नागरिक बाहेरच गाड्या पार्किंग करून कार्यक्रमात जातात. मात्र दुचाकी चोरीच्या धास्तीने निम्मा जीव गाडीकडेच लागलेला असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.