श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर नगररचनाच्या सहायक संचालक कार्यालयात बांधकाम आणि रेखांकनाची हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. याप्रकरणी नाशिक विभाग नगर रचनाचे प्रभारी सहसंचालकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांची सुनावणी झाल्यानंतर श्रीरामपूर शाखा कार्यालयातील तांत्रिक प्रकरणांच्या अनुषंगाने नियुक्त त्रिसदस्यीय समितीने काल चौकशी सुरू केली आहे. कालपर्यंत लिखित तक्रारी आल्या होत्या. आलेल्या तक्रारी वरिष्ठांकडे पाठविल्या जाणार असून त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष बाविस्कर यांनी सांगितले. यांनतर मार्च महिन्यात येथील लवाद कार्यालयाला सहायक संचालक नगररचनाचा दर्जा मिळाला होता.
उत्तरेतील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नेवासा, राहाता व श्रीरामपूर या तालुक्यांचे कामकाज येथे जोडण्यात आले. त्यामुळे जमीन मालक अथवा विकासकर्त्यांची कामे लवकर मार्गी लागतील व त्यांना नगर येथे कामकाजासाठी जाण्याची गरज राहणार नाही.अशी अपेक्षा होती. नगर येथील कार्यालयाने तेथील अभिलेखांचे हस्तांतरण येथे ऑफलाईन पद्धतीने केले होते. सुमारे 1200 प्रकरणे श्रीरामपूर कार्यालयाकडे प्राप्त झाली. मात्र, गत सहा महिन्यांत बांधकाम आणि रेखांकनाची मोजकीच प्रकरणे मार्गी लागल्याने तक्रारी वाढू लागल्या होत्या. श्रीरामपूर शाखा कार्यालयातील विकास व बांधकाम परवानगी प्रकरणांबाबत येणार्या अडचणी संदर्भात क्रेडाईने सहसंचालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन कैफियत मांडली. तसेच यापूर्वी पुण्याचे संचालकांकडेही तक्रारी केल्या होत्या.
त्याअनुषंगाने श्रीरामपूर शाखा कार्यालय, श्रीरामपूर आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन, महसूल स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये श्रीरामपूर शाखा कार्यालयाचे अॅडमिन लॉगिनची सेटिंग योग्यरीत्या नसल्याचे व स्पष्ट कारणे नमुद न करता काही प्रकरणे पुन्हा दाखल केल्याचे निदर्शनास आले होते. सदर कार्यालय क्षेत्रातील ऑफलाईन प्रकरणी घेण्यात आलेल्या बैठकीतही श्रीरामपूर कार्यालयाने मोघम स्वरुपाची माहिती सादर केली. त्यामुळे सदर तांत्रिक प्रकरणांची तपासणी निष्पक्ष होण्यासाठी त्यानुसार नाशिक महानगपालिका नगर रचना विभागाचे उपसंचालक ह.चं. बावीस्कर यांच्या अध्यक्षतेखाली जळगावचे सहाय्यक संचालक रा.म. पाटील, नंदूरबारचे सहायक संचालक महेंद्र परदेशी यांची त्रिसदस्य समिती नाशिक विभाग नगर रचनाचे प्रभारी सहसंचालक दिपक वराडे यांच्या त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली. या समितीने काल श्रीरामपूर येथील कार्यालयास भेट देऊन पहाणी केली. तसेच येथील शासकीय विश्रामगृहात सात तालुक्यांतील वास्तुविशारद, अभियंते, विकसनकर्ते व नागरिकांच्या अडचणी व तक्रारी समजून घेतल्या.
तक्रारी दाखल करण्याचे आवाहन
समितीकडे सुमारे दहा जणांनी लिखित स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. अजून कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी आज गुरुवार दुपारपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन श्री.बावीस्कर यांनी केले आहे. आलेल्या तक्रारी वरिष्ठांकडे पाठविल्या जाणार असून त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.