Tuesday, September 17, 2024
Homeनगरकाँग्रेसच्या तिकीटासाठी प्रभारींसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन

काँग्रेसच्या तिकीटासाठी प्रभारींसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन

आ. कानडे तसेच करण ससाणे-हेमंत ओगले समर्थकांची ‘तुम आगे बढो’ची घोषणाबाजी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

शिर्डी विमानतळावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे आगमन होताच आमदार लहू कानडे गट तसेच करण ससाणे-हेमंत ओगले यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी सुरु असलेल्या स्पर्धेची ‘झलक’ पक्ष प्रभारींबरोबरच उपस्थितांना पहावयास मिळाली.

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला काल (सोमवारी) शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते. काकडी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी आ. कानडे, त्यांचे समर्थक व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले आपल्या समर्थकांसह दाखल झाले. यावेळी एका बाजूला ‘आ. लहू कानडे तुम आगे बढो’, अशा घोषणा दिल्या जात होत्या तर दुसर्‍या बाजुला ‘करण ससाणे-हेमंत ओगले तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.

याप्रसंगी करण ससाणे, हेमंत ओगले, सुधीर नवले, संजय फंड, बाबासाहेब दिघे, अण्णासाहेब डावखर, मुजफ्फर शेख, मुन्ना पठाण, निलेश नागले आदी ससाणे गटाचे तर आमदार लहु कानडे, अशोक कानडे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरूण पाटील नाईक, सचिन जगताप आदी आ. कानडे यांचे समर्थक स्वागतासाठी उपस्थित होते. मागील पंचवार्षिकमध्ये विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसचे तिकीट मिळाल्यानंतर माजी आमदार साई संस्थांचे माजी अध्यक्ष स्व. जयंतराव ससाणे यांच्या तालुक्यातील समर्थकांनी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे सर्वश्रुत आहे. परंतू निवडून आल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे व लहू कानडे यांच्यात राजकीय मतभेद झाल्याने आमदार लहू कानडे यांनी ससाणे गटापासून अलिप्त होत, आपला वेगळा गट निर्माण केला. गेल्या पाच वर्षांमध्ये विधानसभा मतदारसंघात विकास कामांचे जाळे निर्माण केले. प्रत्येक गावामध्ये आपला एक समर्थक वर्ग निर्माण केला आहे.

तर गेल्या पंधरा वर्षांपासून पक्षाने संधी दिली तर विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले हेमंत ओगले यांनीही या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असणारे हेमंत ओगले यांनी मागील पाच वर्षाच्या काळात बेरोजगार तरुण-तरुणींसाठी तसेच व्यवसायिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या दोन पंचवार्षिकपासून त्यांचे ससाणे गटाशी घनिष्ठ संबंध राहिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने संधी द्यावी यासाठी त्यांनी करण ससाणे यांच्यासोबत जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार लहू कानडे यांनी जनसंवाद यात्रा तर करण ससाणे व हेमंत ओगले यांनी शेतकरी-तरुण संवाद यात्रा मतदारसंघांमध्ये सुरू केली आहे. दोघांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल श्रीरामपुरातील काँग्रेच्या या दोन्ही गटांनी पक्ष प्रभारींसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाचे तिकीट कुणाच्या पदरात पडते, हे पाहण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या