श्रीरामपूर (प्रतिनिधी)
पालिकेच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. साठवण तलाव नंबर २ मध्ये पाण्याचा मोठा दबाव निर्माण झाल्याने काल रात्री साडेबारा वाजता हा साठवण तलाव फुटला. तलावातून पहाटेपर्यंतच्या पाच तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. सदरचे पाणी शेजारी असलेल्या शेतीत तसेच स्वप्ननगरी वसाहतीत शिरले. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमणावर नुकसान झाले आहे.
शहराच्या १७८ कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या साठवण तलावाचे खोलीकरण सध्या सुरू आहे. तलावामध्ये चार महिन्यापूर्वी भराव टाकून तलावाचे दोन भाग करण्यात आलेले आहे. प्रवरा कालव्याद्वारे नुकतेच या तलावामध्ये पाणी भरण्यात आले होते. काल रात्री साडेबाराच्या सुमारास टाकण्यात आलेला भराव खचल्याने तलावाच्या दक्षिण बाजूने उतारावर पाण्याचे लोंढा सुरू झाला, सदर पाणी तलावातून बाहेर पडून शेजारच्या शेतात, रस्त्यावर तसेच नागरी वसाहत असलेल्या परिसरातील स्वप्ननगरी या वसाहतीत शिरले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य, फर्निचर तसेच अन्य वस्तू भिजल्याने त्यांचे नुकसान झाले तर शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या कांदा पिकासह इतर पिकांचे नुकसान झाले. तर काही कांदा चाळीतही पाणी शिरल्याने कांदा भिजल्याने या शेतकऱ्यांना मोठा आर्थीक फटका बसला आहे.
रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नागरिकांनी नगरपालिकेला याची कल्पना दिली. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निलेश बकाल यांनी तातडीने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना याबाबत कल्पना देऊन सदरचे पाणी रोखण्यासाठी पोकलॅन्ड उपलब्ध केले. परंतू, पाण्याचा दबाव जास्त असल्याने रात्री पाणी रोखण्यात अपयश आले. शेवटी सकाळी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून सदर पाणी बंद करण्यात आले. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. त्यामुळे भविष्यात श्रीरामपुरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. पिण्याच्या पाण्याचे रोटेशन आता २५ मे च्या दरम्यान सोडण्यात येणार आहे. त्यातही पावसाळा लांबल्यास रोटेशन लांबण्याची शक्यता आहे.
सदर तलावाचे खोलीकरणाचे काम अहोरात्र सुरू असते. रात्री दहा वाजेपर्यंत सदर काम चालते व पहाटे पुन्हा सुरू होते. मात्र, काल काम करणारे लवकर घरी गेले होते. तसेच इथे सुरक्षारक्षक नसल्याने सदरचा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. रात्री उशिरा हा प्रकार समोर आला. पण, खूप रात्र झाल्याने त्यावेळी काहीच करता आले नाही. रात्री निरोप मिळताच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पाणीपुरवठा अभियंता निलेश बकाल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी रात्रीची यंत्रणेची जमवा जमव करून भल्या सकाळी वाहणारे पाणी बंद केले. सदरचे काम करताना संबंधित यंत्रणेने तलावात पाणी भरलेले असल्याने भराव खचला किंवा काय याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची चर्चा शहरात असून फुटलेल्या तलावाची व त्यासंदर्भात झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी श्रीरामपूरकरांनी केली आहे.
श्रीरामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरू असून यामध्ये नगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी तलावामध्ये भराव टाकून तळ्याचे दोन भाग केले होते. चार महिन्यापूर्वी हा प्रयोग करण्यात आला. मात्र, पाण्याच्या दबावामुळे टाकलेला भरावाचा तीस फूट भाग काल वाहून गेल्याने पाच दिवस पुरणारे सुमारे सुमारे नऊ कोटी लिटर पाणी हे तलावातून वाहून गेले. त्यामुळे आगामी काळात शहरवासियांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. एकीकडे तलावाच्या खोलीकरणाचे काम करत असताना दुसरीकडे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे दिव्य नगरपालिकेला पार पाडावे लागणार आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करून शहरवासीयांच्या दृष्टीने योग्य निर्णय नगरपालिका घेईल.
– मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपालिका