Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ कुंभमेळा २०२७ : विकास सिंहस्थापुरता नको; कायमस्वरुपी हवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : विकास सिंहस्थापुरता नको; कायमस्वरुपी हवा

त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले यांचे मनोगत

नाशिक । देशदूत चमू

सिंहस्थ कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी येतो. मात्र 12 वर्षांमध्ये दरवर्षी अनेक मोठमोठे उपक्रम त्र्यंंबकेश्वरमध्ये होत असतात. त्यातून लाखो भाविक गर्दी करतात. त्यामुळे त्र्यंंबकेश्वरला टुरिझम कॉरिडोर बनवण्यासोबतच येणार्‍या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्याची तेवढीच गरज आहे. ते विकसित करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सिंहस्थपुरता विकास नको; तो स्थायी स्वरूपात पर्यटनाला प्रोत्साहन देणारा व्हावा, असे मनोगत त्र्यंबक नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

आगामी सिंहस्थाचा विचार करून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, त्र्यंबकेश्वरला 12 महिने गर्दी असते. वर्षभरातील विविध सण-उत्सवांनिमित्त मोठ्या यात्रा त्र्यंबकेश्वरला भरतात. म्हणून केवळ सिंहस्थापुरती विकासकामे न करता वर्षभर होणार्‍या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशी विकासकामे झाली पाहिजेत, असे मतही घुले यांनी मांडले. सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी होणार्‍या अतिरिक्त गर्दीच्या व्यवस्थापनावर सखोल बारकाईने विचार करण्याची गरज आहे. गेल्या सिंहस्थाची पुस्तिका बनवण्यात आली होती. त्यात सर्व निरीक्षणे नोंदवलेली आहेत. मात्र ती उघडून न पाहता प्रशासन नव्या नियोजनाला भिडले आहे. त्या पुस्तिकेत त्रुटी, चुका, चांगल्या कामांचे शेरे मारलेले आहेत. त्यांचा अभ्यास प्रशासनाने केला पाहिजे. त्यातूनच नव्या नियोजनात अचूकता येईल, असे घुले म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

सिंहस्थ कुंभमेळा हा त्रिखंडित आहे. 2026 ला ध्वजारोहण होणार आहे. 2028 ध्वज अवतरण केले जाणार आहे. त्यामुळे या तीन वर्षांच्या काळात येणार्‍या भाविकांना स्नानाची व्यवस्था करून देण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. समाजात केवळ पर्वणीचा प्रचार केला जातो. मात्र, सिंहस्थ पर्वणीव्यतिरिक्त कुंभकाळात 32 वेगवेगळे पर्वकाळ स्नानासाठी दर्शवण्यात आले आहेत. भाविकांना त्या पर्वकाळातही स्नान करून कुंभमेळ्याचा आनंद घेता येणार आहे. त्याबाबत प्रचार-प्रसार करून नागरिकांमध्ये जागरूकता आणल्यास एकाच वेळी होणारी गर्दी विभागणे शक्य होणार आहे. सूरजकुंडावर तसेच हरकी पावडीवर डॅममधून पाणी आणले जाते. त्र्यंबकेश्वरच्या गोदावरी उगम स्थानावरही फार पाणी नाही. पाणी वाहते ठेवण्यासाठी तळेगाव, काकुरली व गौतमीचे पाणी त्र्यंबकेश्वरमध्ये जलवाहिनीने आणले तर बारा महिने पाणी वाहते ठेवणे शक्य होईल.

त्र्यंबकेश्वर परिसराचा विस्तार छोटा आहे. शाहीस्नानासाठी पारंपरिक पद्धतीने वापरले जाणारे मार्ग छोट्या गल्लीतून व जुन्या मार्गाने होत आहेत. काळानुरूप त्या मार्गात बदल केले पाहिजेत. संत महंतांच्या सल्ल्याने प्रशासनाने याबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये छोट्या गल्ल्यांमध्ये जुने वाडे आहेत. पेशवाई मार्ग विस्तारित करताना या वाड्यांची तोडफोड होऊ शकते. त्यापेक्षा त्यांना हेरिटेज दर्जा द्यावा. जयपूर शहरातील प्रत्येक घराला गुलाबी रंग आहे. त्याच धर्तीवर या वाड्यांना ठराविक रंगाने रंगवून गावाला एक वेगळी ओळख देता येईल. पेशवाई मिरवणुकीसाठी नव्या मार्गाची निवड करावी. त्यासाठी आवश्यक पडताळणी व चाचणी करण्याची गरज आहे, असे घुले यांनी सांगितले.

वाहनतळ खूप दूर
त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ पर्वणीसाठी खूप दूरवर वाहनतळांची व्यवस्था करण्यात येते. तेथे वाहने उभी करून भाविकांना बसने आणले जाते. त्यापेक्षा कैलास डेअरीच्या जवळपास मोठी जागा घेऊन तेथे हब डेव्हलप करावा. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांचा त्रास कमी होईल. वाहनांना बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध होतील.

कचरा डेपो गावाबाहेर न्यावा
घनकचरा व मलजल व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत मलजल प्रक्रिया प्रकल्प हा आद्य शंकराचार्यांच्या समाधी स्थळाजवळ उभारण्यात आला आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासनाने संत-महंतांच्या समाधीचे भान ठेवायला हवे. कचरा डेपो आणि मलजल प्रकल्प तातडीने तेथून हटवणे आवश्यक आहे. दोन्ही प्रकल्प गावाबाहेर नेऊन त्यांचा विस्तार व सक्षमीकरण करावे.

कचरा प्रक्रिया प्रकल्प व्हावा
कचरा डेपोसाठी तळवाडीला दोन एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. दोन एकरात कचरा प्रकल्प होऊ शकत नाही. तेथे केवळ डम्पिंग ग्राऊंड नव्हे तर प्रक्रिया प्रकल्प उभारावा लागेल. त्यासाठी ही जागा अपुरी पडणार आहे. कचर्‍यापासून खतनिर्मिती करून सदुपयोग व्हायला हवा.

प्रदक्षिणामार्ग विकसित करावा
साडेसातशे वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा देण्याची परंपरा होती. तेथे वनराई, देवराई होती. आज त्यासाठी फेरीमार्ग विकसित करून त्याला तीर्थाचे स्वरूप दिल्यास त्या मार्गावर ठिकठिकाणी रैनबसेरा दवाखाने उभारावेत. विनाधूर कारखान्यांची मालिका उभारावी. त्र्यंबकेश्वरमध्ये 32 कुंड आणि विविध धार्मिक स्थळांची मोठी संख्या आहे. या सर्व स्थळांना प्रदक्षिणा देण्यापेक्षा ब्रह्मगिरीभोवती प्रदक्षिणा दिल्यास सर्वांना पुण्य प्राप्त होते, अशी पूर्वापार धारणा होती. ती विकसित करून भाविकांसाठी हा फेरीमार्ग सक्षम करून द्यावा. येथील काही कुंडे नामशेष होत आहेत. त्यांना पुनर्जीवित करता येईल. ब्रह्मगिरी पर्यटन फेरीमार्गावर इको-सिस्टिम उभी करून नागरिकांना व स्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतील. ब्रह्मगिरी पर्वतावर वनराईची निर्मिती करून नागरिकांना निसर्गाचा आनंद देता येईल, असेही घुले यांनी सांगितले.

मद्य व मांसविक्री गावाबाहेर करावी
त्र्यंबकेश्वर धार्मिक स्थळ आहे. अनेक धार्मिक पूजाविधी येथे करण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने दाखल होतात. येणार्‍या भाविकांना शहरांतील मांसविक्रीची दुकाने तसेच दारू दुकाने नजरेस पडतात. त्याबद्दल भाविकांमध्ये नाराजीचा सूर दिसतो. धर्मस्थळी अशा व्यवसायांना दूर स्थान दिले पाहिजे. किंबहुना शहराबाहेर त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. प्रशासनाने येथे सिंहस्थकाळात या व्यवसायांना त्र्यंबकेश्वरबाहेर जागा देऊन स्थलांतरित करणे योग्य ठरेल.

टुरिझम टाऊनशिप बनवा
शासनाने त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटन योजनांची उभारणी करावी. टुरिझम टाऊनशिप बनवण्याची आवश्यकता आहे. सापुताराच्या टेकडीवर काहीही नाही. मात्र तेथे पर्यटकांची गर्दी असते. आपल्याकडे ऐतिहासिक वारसा असलेला ब्रह्मगिरी पर्वत आहे. रोपवेने तेथे जाण्याची व्यवस्था केली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी करतात. पर्यटनासोबतच तेथे असलेले भगवान शंकराचे पाऊल व जैवविविधतेचे दर्शन पर्यटकांना घडू शकेल. त्यातून त्र्यंबकेश्वरचा पर्यटन विकास होईल.
कैलास घुले, माजी नगराध्यक्ष, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

हत्ती पोसण्यासारखी स्थिती
त्र्यंबकेश्वर नगरपालिका ‘क’ वर्ग गटातील नगरपालिका आहे. शहरविकासासाठी शासनाकडून 25 लाखांचे अनुदान मिळते. त्र्यंबकेश्वर हे धार्मिक पर्यटनस्थळ आहे येथे येणार्‍या भाविकांना सोयीसुविधा देण्यात मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मलजल प्रक्रिया प्रकल्प व्यवस्थापन म्हणजे नगरपालिकेच्या दृष्टीने हत्ती पोसण्यासारखी स्थिती दिसते. शासन अनुदान 25 लाखांवरून 5 कोटी करण्याची गरज आहे. प्रसाद क्लस्टर उभारले पाहिजे. घाटांच्या निर्मितीची गरज आहे. चंद्रभागा लास्ट ते प्रयाग तीर्थपर्यंत घाट बांधण्याची गरज आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...