मुंबई | प्रतिनिधी Mumbai
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याच्या अध्यादेशास मंगळवारी चोंडी (जि. अहिल्यानगर) येथे झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्राचीन शास्त्रांनुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर १२ वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा लाखो भाविकांना आकर्षित करणारा आध्यात्मिक सोहळा आहे. या पर्वात देशभरातून तसेच परदेशातून कोट्यवधी भाविक, साधू-संत, विविध अखाडे, यात्रेकरू, पर्यटक आणि अभ्यासक सहभागी होतात. सन २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे अडीच कोटी भाविकांनी सहभाग घेतला होता. येत्या कुंभमेळ्यासाठी भाविकांची संख्या चार ते पाच पट वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे या महाकाय धार्मिक उत्सवासाठी अत्यंत व्यापक आणि कार्यक्षम नियोजन, सुयोग्य समन्वय यांची आवश्यकता असल्याने त्यासाठी प्राधीकरणाची गरज होती. नुकताच प्रयागराज उत्तर प्रदेश येथे कुंभमेळा पार पडला. येथे नियंत्रण आणि समन्वयासाठी कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती.
या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व भाविकांचे अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन करणे शक्य झाले.त्याच धर्तीवर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाबाबतच्या अध्यादेशास तसेच प्राधिकरणासाठी नवीन पदे तसेच प्रतिनियुक्तीने पदे भरण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.