पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्याचे जलसंपदा,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. सकाळी ११ वाजता रामकुंड येथून त्यांनी दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह महापालिका व विविध शासकीय विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शाही स्नानासाठी साधू-महंतांसह लाखो भाविक रामकुंड आणि गोदाघाट परिसरात एकत्र येतात. भाविकांना स्नानासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या. तसेच, पावसाळ्याच्या अनुषंगाने संत गाडगे महाराज पुलाखाली साधू-महंतांच्या रथांसाठी रॅम्प तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.
यानंतर मंत्री महाजन आणि अधिकाऱ्यांनी काळाराम मंदिर, सीतागुंफा परिसरातील वाहन पार्किंग व अतिक्रमणविषयक स्थितीची पाहणी केली. तसेच टाकळी घाट, दसक पंचक घाट, नाशिकरोड रेल्वे स्टेशन, सिटीलिंक बस डेपो आणि तपोवनातील साधूग्राम परिसरालाही त्यांनी भेट दिली.
प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पूल व घाट परिसराची सविस्तर माहिती यावेळी मंत्र्यांना दिली. सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा पाहणी दौरा तपोवन येथे दुपारी २ वाजता समाप्त झाला. त्यानंतर दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा बैठक घेतली.