नाशिक | प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाशिकच्या विकासकामांबद्दल प्रशासन गतीने कामाला लागले असून, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मलजल वाहून नेणारे २९ नाले बंदिस्त करण्याचे नियोजन सुरू झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी आढावा बैठकीनंतर दिली.
शहरातील नैसर्गिक नाल्यांच्या माध्यमातून गोदावरी व नासर्डी नदीचे प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषित करणाऱ्या नैसर्गिक नाल्यांना बंदिस्त करून स्वतंत्र मलजलवाहिनी प्रक्रिया प्रकल्पात टाकण्यात येणार आहे. साधुग्रामसाठी किमान २ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून शासनाकडे त्यादृष्टीने पाठपुरावा केला जाणार आहे. तत्पूर्वी सविस्तर आराखडा तयार करण्यात येत असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.
नदीत प्रदूषण होऊ नये यासाठी वेळो वेळी प्रयत्न केले जात असले तरी मोठ्या प्रमाणात शहरातून मलजल वाहून आणणाऱ्या नाल्यांच्या माध्यमातून नदी प्रदूषित होत असते. ही बाब लक्षात घेत मनपा प्रशासनाने नदीच्या शहरी भागाकडील १७ व शेती भागाकडील १२ नाल्यांना जागेवर बंदिस्त करुन त्यांचे मलजल थेट स्वतंत्र वाहिनीतून जवळच्या प्रक्रिया प्रकल्पात नेले जाणार आहे. याबाबतच्या कामाचे स्वरूप आणि दिशा निश्चित करण्यात आली असून, लवकरच त्याची निविदा काढली जाणार आहे. राज्य शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल सादर केला जाईल. राज्य शासनाद्वारे निधी मिळवून त्याचे काम वर्ग केले जाईल. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या कामाला गती देण्याचे सांगितल्याने ही प्रक्रिया गतीने करण्यात येणार असल्याचे खत्री यांनी सांगितले.
आगामी सिंहस्थासाठी तयार होणारे मोठे रस्ते, गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी एसटीपी प्रकल्प आणि गोदावरील पूल या कामांना दोन वर्षाचा कालावधी लागणार असून अधिक कालावधी लागणाऱ्या मोठ्या कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिल्या आहेत.
काल जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत सिंहस्थ आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मोठ्या रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला २,२७० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून संबंधित विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवत रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.
तर गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी एसटीपी प्रकल्पाचे सादरीकरण शासनाकडे करण्यात येणार असून, शासनाकडून मंजुरी आल्यानंतर निविदा प्रक्रिया करत एप्रिलपासून प्रत्यक्ष एसटीपीच्या कामांना सुरूवात होणार आहे. शासनाकडून जसाजसा निधी प्राप्त होईल, त्यानुसार टप्प्याटप्प्याने मोठ्या कामांना प्राधान्य देत ते मार्गी लावले जाणार असल्याचेही गेडाम यांनी सांगितले.
५ पुलांचे काम तातडीने हाती, २ पुलांची निविदा
सिंहस्थासाठी हाती घेतलेल्या ११ पुलांपैकी २ पुलांच्या निविदा झाल्या आहेत. तर उर्वरित ९ पुलांपैकी रामवाडी पूल, सुंदरनारायण पूल व रामसेतू यासह एकूण ५ पुलांचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.
रामकालपथ गतिमान
रामकाल पथाचे नियोजन व आरेखन आराखडा अंतिमतः तयार केला जात आहे. कामाची निविदा एप्रिलमध्ये काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गती देण्यात येत आहे.
पाणीपुरवठ्याचा आराखडा सादर करा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत पिण्याचे व वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे अंदाज घेत पाणीपुरवठ्याचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला देण्यात आल्या. त्र्यंबकेश्वराच्या पाणीपुरवठ्याबाबतचा आराखडा देखील तयार करण्यात आला असून नाशिकचा पाणीपुरवठा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.
दोन वर्ष कालावधी लागणारे मोठे प्रकल्प
विकासकामांना जास्त कालावधी लागणाऱ्या कामांबरोबरच नाशिक – धुळे, नाशिक त्र्यंबक रस्त्याची कामे गतीने सुरु करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. गोदावरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलांच्या कामांनाही आता सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्याचे निर्देश मनपाला दिले आहेत. त्यासोबतच मलजलप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) यांचे तातडीने अहवाल करुन शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी टेंडरिंग करून सप्टेंबरमध्ये कामाला सुरुवात केली जाईल व पुढील जूनपूर्वी काम पूर्ण करण्याची अट या टेंडरमध्ये नमूद करण्यात येणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.
संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही
सिंहस्थासाठी साडेचार हजार सीसीटीव्ही शहरात ठिकठिकाणी बसवण्यात येणार असून, संवेदनशील ठिकाणांचे मॅपिंग करत सूक्ष्म नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक बाबींचा विचार करता सध्या अस्तित्वात असलेले सीसीटीव्ही कार्यक्षम असल्याची खातरजमा करण्यात येणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा