अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मतदार याद्या अचूक आणि बीएलओंकडून गृहभेटी पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहीम राबवली जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून बारा विधानसभा मतदारसंघांत पूर्व तयारीचा टप्पा सुरू आहे. जिल्ह्यात 38 लाख 26 हजार 763 मतदारांपैकी 31 लाख 60 हजार 919 मतदारांची मॅपिंग पूर्ण झाली आहे. मॅपिंग झालेल्या मतदारांची टक्केवारी 82.60 इतकी आहे. अजूनही जिल्ह्यातील 6 लाख 65 हजार 844 मतदार मॅपिंगच्या प्रतिक्षेत आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाने एसआयआर मोहिम केवळ मोहीम नसून, यामध्ये मतदारांकडून अर्ज भरून घेताना माहितीची खात्री करावी लागणार आहे. शिवाय प्रांताधिकारी स्तरावर सुनावणीदेखील घेतली जाणार आहे. त्यामुळे डोळ्यांत तेल घालूनच एसआयआरचे काम करावे लागणार आहे. या मोहिमेची पूर्व तयारी म्हणून सध्या मतदार याद्याचे मॅपिंग कडे पाहिले जात आहे. या मॅपिंपमध्ये बारा विधानसभा मतदारसंघांत 26 मे पर्यंत 82.60 टक्के काम झालेले आहे. आयोगाकडून कुठल्याही क्षणी एसआयआर राबविण्याचे आदेश धडकू शकतात, हे ओळखून कामाची गती वाढवली आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार स्तरावर बैठका सुरू आहेत. बीएलओंकडून आढावा घेत आहेत.
नगर, राहुरी, श्रीगोंद्यात सर्वात कमी
जिल्ह्यात सर्वाधिक मॅपिंग अकोले विधानसभा मतदारसंघात 91.57 टक्के व संगमनेर 91.57 टक्के तर सर्वात कमी मतदारसंघात अहमदनगर शहर 64.89 टक्के झाली आहे. तर राहुरी 78.48 टक्के, श्रीगोंदा 81.90 टक्के आहे. जिल्हा निवडणूक शाखेला मॅपिंगची टक्केवारी वाढविण्यासाठी या तीन मतदारसंघावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
6 लाख मतदारांचे मॅपिंग प्रलंबित
जिल्ह्यात मतदार मॅपिंग मोहिमेला प्रशासनाने मोठी गती दिली आहे. जिल्ह्यातील एकूण 38 लाख 26 हजार 763 मतदारांपैकी 31 लाख 60 हजार 919 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही 6 लाख 65 हजार 844 मतदारांचे मॅपिंग प्रलंबित असल्याने प्रशासनासमोर आव्हान कायम आहे.
मतदारसंघनिहाय मॅपिंग पूर्ण
अकोले 2,46,475 (91.57 टक्के), संगमनेर 2,65,962 (91.51 टक्के), शिर्डी- 2,42,520 (82.42 टक्के), कोपरगाव 2,40,671 (83.23 टक्के), श्रीरामपूर 2,63,480 (86 टक्के), नेवासा 2,36,587 (82.60 टक्के), शेवगाव 3,16,969 (84 टक्के), राहुरी 2,61,005 (78.48 टक्के), पारनेर 2,98,677 (83.31 टक्के), नगर 2,09,771 (64.89 टक्के), श्रीगोंदा 2,85,029 (81.90 टक्के), कर्जत-जामखेड 2,93,773 (83.68 टक्के).




