श्रीरामपूर । प्रतिनिधी
सध्या नगरपालिका प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांच्या योजनेच्या संदर्भात नगरपालिकेकडून शहरात जे नोंदणी मदत कक्ष उभारण्यात आले आहेत ते शहराच्या ठराविक भागात उभारून इतर भागातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना सावत्रपणाची वागणूक देत वंचित ठेवण्याचे काम नगरपालिकेकडून होत असल्याने शहरातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात शासनाच्या पोर्टलवर देखील तक्रारी करण्यात आल्या आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी नाव नोंदणी धूमधडाक्यात सुरू आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यामध्ये यासाठी शुक्रवार आणि शनिवार दोन दिवसाची नोंदणी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र नियोजन करण्यात आले आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने देखील यासाठी चार मदत केंद्रे स्थापित केली आहेत. मात्र, ही चार ही मदत केंद्रे शहराच्या ठराविक भागात आहेत..
लोकमान्य टिळक वाचनालयातील आगाशे हॉल, खासदार गोविंदराव आदिक सभागृह संगमनेर रोड, शाळा क्रमांक सात मोरगे वस्ती तसेच मिनी स्टेडियम तलाठी कार्यालयाजवळ अशी ही चार केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र, शहराचा सर्वात मोठा भाग असलेल्या वार्ड नंबर २ सह संजयनगर, गोपीनाथनगर, लक्ष्मीनारायण नगर, रामनगर, फातिमा कॉलनी, मिल्लतनगर, गोंधवणी रोड, आंबेडकर वसाहत, गिरमे मळा, गोंधवणी गाव आदी मोठ्या भागासाठी कोणतेही मदत केंद्र उभारण्यात आलेले नाही. या भागातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या बहिणी या सावत्र आहेत की काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. नगरपालिकेने ठराविक भागातच ही केंद्रे स्थापित करून शहराचा अध्यर्ध्यापेक्षा जास्त भाग वंचित ठेवल्याबद्दल शहरातील भगिनींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत बोलताना संजयनगर भागातील शकुंतला साळुंखे यांनी सांगितले की, आमच्या भागातील महिला भगिनींना या चारही केंद्रात जाणे खूप लांब पडत आहे. त्यामुळे आमच्या भागात सुद्धा हे मदत केंद्र आवश्यक आहेत. या संपूर्ण भागामध्ये नगरपालिकेच्या तसेच खाजगी अनेक शाळा आहेत. त्या ठिकाणी या केंद्रासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. असे असताना नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची कोणतीही दखल न घेता आपल्याला योग्य वाटेल अशा ठिकाणी ही केंद्रे कार्यान्वित केली आहेत. ही सर्व केंद्रे मुख्य रस्त्यांवर आहेत. परंतू शहराचा उपनगरातील हा मोठा परिसर यापासून वंचित राहिला आहे. तरी नगरपालिकेने तातडीने वार्ड नंबर दोन, संजयनगर, रामनगर, लक्ष्मीनारायण नगर, गोंधवणी गाव, गिरमे मळा आदी परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणींच्या बहिणींच सोयीसाठी तातडीने मदत केंद्रे उभारावी, अशी मागणी केली आहे.