Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधभगिनींना, आरोग्याची हेळसांड थांबवा!

भगिनींना, आरोग्याची हेळसांड थांबवा!

डॉ. रंजना देशपांडे

घरातील स्री कुटुंबासाठी राबराब राबते. सगळ्यांच्या सवयींची, दैनंदिनीची, आरोग्याची देखभाल घेते, पण या सगळ्या रामरगाड्यात स्वतःच्या आरोग्याकडे मात्र तिचे दुर्लक्ष होते. याचा परिणाम थकवा येणे, सुरकुत्या येणे यासह विविध प्रकारे आजार जडण्यात होतो. त्यातही स्री नोकरदार असेल तर विचारायलाच नको! पण स्वत:साठी थोडा वेळ दिला आणि नियमितता व स्वयंशिस्त पाळली तर आरोग्य उत्तम राखणे फारसे अवघड नाही. शेवटी तुम्ही घराचे इंजिन आहात हे लक्षात ठेवा!

- Advertisement -

8 मार्च हा एकच दिवस असतो का महिलेचा? वर्षाचे 365 दिवसही तिचेच असतात. तिच्या कामाचे… तिच्या कर्तृत्वाचे, तिचे अपत्यांसाठी झिजण्याचे! तिला कोणी सांगत नाही की, अगं मुलांची शाळा आहे, त्यांना उठव, त्यांचे डबे कर, नवर्‍याचा डबा भरून दे….! पण ती हे सर्व न सांगता, न चुकता वर्षानुवर्षे करत असते. स्वयंसिद्धाच ती! पण या स्वयंसिद्धेला स्वत:च्या आरोग्याची, स्वास्थ्याची म्हणावी तशी काळजी नसते. नपेक्षा ती घेत नाही. त्यातून ती स्त्री नोकरी करणारी असली तर पाहायलाच नको. सर्वात जास्त दुर्लक्षित होते ते स्त्रीचे खाणे-पिणे आणि व्यायाम. हा लेख ज्यांच्यापर्यंत जाणार आहे त्या मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीय महिलांना घरात खायला-प्यायला कमी असते अशातला भाग नाही. पण नेमकी समय-योजना, आवडीनिवडीचे उगीचच माजवलेले अवास्तव स्तोम, अत्याधुनिकतेच्या नावाखाली नेहमीचे साधे सोपे पण पौष्टिक पदार्थ सोडून इतर गोष्टींचा केलेला हव्यास हा पहिला वर्ग! दुसर्‍या वर्गात येतात त्या घरात काम करणार्‍या म्हणजे कपडे, भांडे झाडू-पोछा, साफसफाई करण्यास म्हणजे थोडक्यात मोलमजुरी करणार्‍या, शेतात, रस्त्यावर, बांधकामावर राबणार्‍या स्त्रिया. त्यांचे प्रश्नच वेगळे असतात. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल. उच्चभू वर्गातील महिला, नाटक-सिनेमा या क्षेत्रातील महिला. या तिसर्‍या वर्गात मोडतात. अभिनयाच्या क्षेत्रातील महिलांचे आणि पुरुषांचेसुद्धा चांगले दिसणे, फिट राहणे हे भांडवलच असते. त्यामुळे या वर्गातील सर्वचजणी आपले आरोग्य, आहार, व्यायाम या बाबतीत अतिशय जागरुक असतात आणि प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्न करतात.

आपण आधी पहिला वर्ग घेऊ. म्हणजे साधारणत: नोकरी- व्यवसाय करणार्‍या आणि नोकरी न करणार्‍या! आजकाल नोकरी-व्यवसाय करणार्‍याच महिला जास्त आहेत. त्यांना एक्सरसाईज होत नाही तर एक्झर्शन होते. ते टाळण्यासाठी समय नियोजन हे सर्वात महत्त्वाचे. म्हणजे सगळ्या कामाच्या रामरगाड्यातून स्वत:साठी थोडा वेळ देता येईल. दुसरे म्हणजे नियमितता आणि स्वयंशिस्त. शिस्त ही घरातल्या स्त्रीला असली तर घरातील सगळ्यांनाच लागते.

घरातील सगळे उठायच्या एक तासभर आधी घरातील स्त्री उठली तर तिला स्वत:साठी वेळ मिळेल. सुरुवातीला जड जाईल, पण एकदा का सवय लागली आणि त्यातले सुख समाधान, फायदा कळू लागला की उठण्याचा त्रास वाटेनासा होईल. जाग आल्या आल्याच बिछान्यात हात-पाय ताणण्याचे व्यायाम ती करू शकते. मानेच्या हालचाली, आळस देताना पूर्ण खांद्यापासून हात मागे ताणणे, डोक्याच्या वर नेऊन आळोखे-पिळोखे देणे हा सर्व सांध्यांना, स्नायूंना मोकळा करायचा व्यायाम आहे.

सकाळचे आन्हिक आटोपल्यावर चहाला आधण येईस्तोवर उठाबशा काढणे, हस्त-पाय संचालन करणे. स्वयंपाकघरातीलच हा पण एक सहजसोपा करता येण्यासारखा व्यायाम आहे आणि फायद्याचा पण!

तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीतही! रोज रात्री बदाम किंवा चणे, मूग, मटकी काहीतरी भिजवून सकाळी उठल्यावर खाणे! हे काम तर घरातील 7-8 वर्षांची मुलेही आनंदाने करतात. प्रत्येकी दोन बदाम किंवा चमच्याचे प्रमाण सांगून दिले की ते मोजून व्यवस्थित पाण्यात टाकतात आणि आठवणीने करतात. आपल्यावर आईने एक काम सोपवलेय आणि आपण ते रोज आठवणीने, जबाबदारीने करतोय याच्या जाणिवेने त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच पण तेवढा वेळ मूलही आपल्या सहवासात अधिक राहते. फोन, मोबाईल्स, कार्टून फिल्मस् बघत बसत नाही. हा आनंद एकदा मिळवून तर पाहा भगिनींनो!

रात्री भिजवलेले बदाम, चणे, वाटाणे, दाणे, मेथी जे काही असेल ते चहाबरोबर खा. त्याबरोबर थोडासा गूळ खा. प्रोटिन्स चण्यातून आणि आयर्न गुळातून मिळतील…तेही भरपूर प्रमाणात! कधी कधी बदल म्हणून शेंगदाणे-गूळ, फुटाणे-गूळ खाल्ले तरी आपला उद्देश सफल होतो. अगदी घरगुती काम करणार्‍या महिलादेखील हे करू शकतात. नाहीतर कशा तग धराल… एवढ्या धकाधकीच्या आयुष्यात!

सकाळी घाईच्या वेळी भाजी-पोळी किंवा जे जमेल ते करा. ऑफिसमध्ये जाताना पर्समध्ये गुळपापडी, शेंगदाण्याचा लाडू ठेवला तर किती छान! एखाद्या वेळेस कॅडबरी मिल्कबार ठेवलात तरी चालेल, खाल्ल्या-खाल्ल्या मात्र पाणी पिणे आवश्यक. दाताला चिकटलेली कोको पावडर हानी करते दातांची! शक्य असेल तर सुका मेवाही ठेवावा. खारीक एकदम लोहतत्त्वाने भरपूर. शिवाय तत्काळ एनर्जी देणारी! हल्ली स्त्रियांमध्ये अ‍ॅनिमिया खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. अगदी सुखवस्तू घरातील महिलांमध्येही! त्याला कारण खाण्याच्या सवयी! स्वयंपाकाच्या सवयी! अगदी ठरवून रोज एकदातरी लोखंडाच्या कढईत भाजी किंवा वरण करा. लोखंडाच्या कढईत शेंगांची भाजी, वांग्याची भाजी, फोडणीचे वरण, पिठले बघा एकदा करून. एकदम सुवर्ण चव येते आणि वर लोहतत्त्वही भरपूर प्रमाणात मिळते. सोपे आहे की नाही!

‘आमच्या रियाला मॅगीच आवडते बाई, रोज संध्याकाळी मी तेच करते. त्याशिवाय ती जेवतच नाही…’ असे संवाद घरोघर ऐकू येतात. पात्रे, संवाद, बदलतात, मॅगीच्या ऐवजी पास्ता, पिझ्झा वर्दी लावतात. मतितार्थ तोच! पण ‘रियाला मॅगीची ओळख कोणी करून दिली?’

मला माहितेय की 9-10 तास बाहेर काम करून आल्यावर परत घरी परतून स्वयंपाक करायचा म्हणजे थकवा येतो, कंटाळा येतो, पण आपल्या घरकुलासाठीच करतो ना आपण! सुदैवाने आजकाल घरगुती मदत मिळतेच मिळते. घरातील वरिष्ठ महिला, पोळीवाली मावशी, स्वयंपाकाच्या काकू! कंटाळा आला तर एक डिश मेनू बनवा एखाद्या वेळी! मिश्र डाळींची खिचडी, त्यात भाज्या टाका, डाळी 2-3 प्रकारच्या टाका. मुगाची डाळ सालासकट वापरा. मसूर आणि तूरही चांगली लागते. डाळ-ढोकळी, वरणफळ, कडबोळी किती तरी पदार्थ आहेत. घरी आईंना किंवा आईला विचारा. भरपूर उत्साहाने आणि प्रेमाने करतील. अर्थात, काही अपवाद असतातच. ही कडबोळी मिश्र पिठाची करा. त्या पास्त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली लागतात. शिवाय पौष्टिकही होतात. सातूचे पीठ, मेतकूट हेही असेच चविष्ट, पौष्टिक आणि तत्काळ वापरणारे पदार्थ आहेत. थालिपीठ हेही पूर्णअन्न आहे. बहुतेक सगळेच आवडीने खातात.

रोज अंडी खाल्ली तर कॅल्शियम आणि प्रोटिन्स दोन्हीचीही गरज भागेल. शिवाय आठवड्यातून एकदा चिकन-मीट घेतले तर चांगले! मासळी पण चांगली! ज्यांना हे चालत नाही त्यांना कॅल्शियमसाठी दुग्धजन्य पदार्थ, सीताफळ, पेरू, केळी हे कॅलशियमचा पुरवठा करू शकेल. खूप जणींना दूध आवडत नाही. सीताफळ, पेरू बाराही महिने मिळत नाहीत. केळी मिळतात. एक सोपा उपाय सांगते. कढीपत्ता मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो आणि स्वस्तही आहे. कढीपत्त्याची ताजी पाने तेल न टाकता तशीच भाजून घ्या. छान कुरकुरीत होतात. त्यांची बारीक पूड करा. त्यात आवडीप्रमाणे तीळ भाजून टाका. साधारणत: एक वाटी पूड असेल तर एक वाटी तीळ घ्या. त्यात चवीपुरते मीठ घालून एकत्र मिश्रण करून घ्या. येता-जाता तोंडात टाकायला हरकत नाही, मुखशुद्धी म्हणूनही! शिवाय कॅलशियम भरपूर प्रमाणात! होय, कढीपत्यामध्ये कॅल्शियम, लोह भरपूर असते.

बाकी सगळ्या मोसमी भाज्या, फळे यांचा वापर कराच. त्याच्याबद्दल आजकाल खूपच माहिती सगळीकडून मिळते. तेव्हा त्याचाही उपयोग करा आणि आरोग्य उत्तम ठेवा. तरुण वयातही अनारोग्याचे परिणाम दिसू लागतात. एकदा चाळिशी ओलांडली की थकवा येणे, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, सुरकुत्या दिसणे, निस्तेज त्वचा, पांढरे आणि निर्जीव वाटणारे केस हे आणि असे दुष्परिणाम दिसू लागतात. ब्यूटी पार्लरला जाऊन, ब्यूटी ट्रिटमेंट घेऊनही फार थोडा फरक दिसतो आणि तोही काही काळच! तर भगिनींनो, आधीच थोडासा वेळ काढलात स्वत:साठी तर चांगले राहील ना! त्यासाठी थोडे कष्ट, थोडी शिस्त लावा स्वत:च्या आयुष्याला; जपा स्वत:ला आणि पर्यायाने तुमच्या माणसांना! गाडी व्यवस्थित मेंटेन असली तरच चांगली चालते आणि बाकीच्यांनाही व्यवस्थित गंतव्याला पोहोचवते. तेव्हा छान हवा घ्या. व्यायाम करा, स्वत: सुखी राहा इतरांनाही सुखी करा!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या