Friday, May 3, 2024
Homeनाशिकघरकुल योजनेबाबत ठिय्या आंदोलन

घरकुल योजनेबाबत ठिय्या आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

रमाई आवास योजनेंतर्गत Ramai Awas Yojana तालुक्यातील कंक्राळे Kankrale येथे लाभार्थ्यांना पहिल्या हफ्त्याची रक्कम अदा करण्यात आली असतांना देखील नंतर घरकुल रद्द झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या योजनेचा लाभ एकाच कुटूंबातील पाच-सहा जणांना देण्याबरोबर ज्यांनी घरकुल बांधली नाहीत त्यांना देखील देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

घरकुलाअभावी गत एक ते दीड वर्षापासून उघड्यावर राहण्याची वेळ आलेल्या संतप्त लाभार्थ्यांनी बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव, पं.स. सदस्य अरुण पाटील, सामाजिक कार्यकर्ते पिंटू अहिरे, दादा इंगळे, बंडू कुंवर आदींच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर panchayat Samiti Malegaon धडक देत गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

यावेळी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा अधिकार्‍यांकडून भेदभाव होत असल्याचा आरोप बच्छाव यांनी केला. गरीबांना हक्काचे घर मिळावे या उदात्त हेतूने शासनाने रमाई आवास योजना सुरू केली. मात्र सदर योजना अधिकार्‍यांमुळे पोखरली जात आहे. दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टांची कागदोपत्री पुर्तता होत असली तरी अनेकांना हक्काच्या घरापासून झगडावे लागत असल्याचे कंक्राळे येथील गोरगरीब लाभार्थ्यांच्या व्यथांवरून दिसून येत आहे.

एकाच कुटूंबातील पाच ते सहा जणांना योजनेचा लाभ दिला जातो. काही लाभार्थ्यांनी तर घरकुल न बांधता योजनेची पूर्ण रक्कम लाटली आहे. काहींनी तर दहा वर्षात दोन ते तीन वेळा योजनेचा लाभ घेतला आहे व तो अधिकार्‍यांनी दिला देखील आहे. मात्र, योजनेत पात्र असलेले अनेक लाभार्थी अजून घरकुलापासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांमध्ये विधवा महिला तसेच अपंग व्यक्तींचा देखील समावेश आहे. शासनाकडून राबविल्या जाणार्‍या या योजनेचा अधिकार्‍यांकडूनच भेदभाव केला जात असल्याचा आरोप बच्छाव यांनी केला.

कंक्राळे येथील लाभार्थ्यांना 2019 मध्ये रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. पहिल्या हफ्त्याची 15 हजार रूपयांची रक्कम देखील अदा केली गेल्याने त्यांनी आपले मातीचे घर पाडून त्या ठिकाणी पक्के बांधकाम सुरू केले उर्वरित रक्कमेसाठी नियमाप्रमाणे फोटो व कागदपत्रे सादर केली मात्र पुढील हप्त्यासाठी ग्रामसेवकाकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर थेट घरकुल रद्द झाल्याचे सांगितले. गोरगरीबांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणार्‍या ग्रामसेवकासह संबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच उघड्यावर राहणार्‍या कुटुंबीयांना योजनेचा उर्वरित हफ्ता त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी यावेळी बच्छाव यांच्यासह लाभार्थ्यांनी केली.

याप्रकरणाची दोन दिवसात सखोल चौकशी करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी देवरे यांनी दिले. तसेच एकाच कुटूंबातील अनेकांना लाभ मिळवून देणार्‍या संबंधितांवर देखील योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वही गटविकास अधिकार्‍यांनी दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात प्रकाश गवळी, सोनू भदाणे, ज्ञानेश्वर पवार, सुनिल गुटले यांच्यासह कंक्राळे येथील घरकुलापासून वंचित लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या