Wednesday, June 10, 2026
Homeनगरदोन किलो सोने घेऊन सहा कारागीर पळाले; सराफ बाजारात खळबळ, सोनारांच्या विश्वासाचा...

दोन किलो सोने घेऊन सहा कारागीर पळाले; सराफ बाजारात खळबळ, सोनारांच्या विश्वासाचा गैरफायदा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

येथील सराफ बाजारातून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक (२०२१ ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि चोख सोने (अत्यंत शुध्द आणि अस्सल सोने) घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी सोनार कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी रस्ता, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (२७ ऑक्टोबर) फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सहा संशयित कारागीरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा, स्नेहा बेरा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा संशयित कारागीरांची नावे आहेत. फिर्यादी कृष्णा देडगावकर आणि त्यांचा भाऊ प्रतिक देडगावकर यांचे देडगावकर ज्वेलर्स नावाने सराफ बाजारात दुकान आहे. दुकानाच्या तळमजल्यावर कारागीर दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सत्तु बेरा, स्नेहा बेरा हे दागिने बनवण्याचे काम करत होते. तसेच सोमनाथ सामंता आणि आन्मेश दुलोई हे दुकानासमोरील दुसरे सोनार विजय जगदाळे यांच्या दुकानाच्या ठिकाणी कारागीर म्हणून काम करत होते.

रविवारी (२६ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी कृष्णा देडगावकर तळमजल्यावर गेले असता कारागीर दिपनकर माजी जागेवर नव्हता. फोन करून विचारणा केली असता तो दहा मिनिटांत येतो असे म्हणाला. परंतु बराच वेळ उलटूनही तो आला नाही आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागला. त्याचवेळी इतर कारागीरांचे मोबाईलही बंद मिळाल्याने संशय निर्माण झाला. फिर्यादी यांनी संबंधित कारागीरांच्या घरी जाऊन चौकशी केली असता घरे कुलूपबंद आढळली. अखेर चौकशीअंती खात्री झाली की हे कारागीर सोन्याचे दागिने घेऊन पळून गेले आहेत.

या चोरीत एकूण २ किलो २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोख सोने चोरीस गेले असून त्याची एकूण किंमत १ कोटी १ लाख ५ हजार रूपये इतकी आहे. चोरी गेलेल्या सोन्यात कृष्णा देडगावकर, प्रतीक देडगावकर, विजय जगदाळे, सागर गुरव, भरत शिराळकर, बरजहान शेख, प्रमोद गाडगे, आणि इम्रान अली या सोनारांचे सोने समाविष्ट आहे.

मोबाईल बंद, शोध सुरू

कारागीरांनी गेल्या काही महिन्यांत सोनार व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून लबाडीने ही चोरी केली. या कारागीरांचे पूर्ण पत्ते उपलब्ध नाही. त्यांचे मोबाईल बंद येत आहे. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, संशयित कारागीरांचा शोध सुरू आहे. त्यांचे मोबाईल बंद असल्याने तपासात अडचण येत आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांच्या चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी (Police) न्यायालयात (Court) तब्बल ३०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट)...