अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिरूर (जि. पुणे) येथून नगर शहरातील मंगलगेट भागात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन येणार्या चार पिकअप तोफखाना पोलीस व शहर वाहतूक शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून पकडल्या. त्यातून लहान- मोठे मिळून 66 जनावरे, चार पिकअप असा एकूण 11 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेतले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार मन्सुर सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. वसीम इसाक सय्यद (वय 35 रा. खाटीक गल्ली, राहुरी), आतिक लतीफ कुरेशी (वय 32 रा. इस्माईलनगर, राहुरी), सुलतान एनुद्दिन मदारी (वय 36 रा. इस्लामपुरा, मदारी वस्ती, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) व इरफान शेख (रा. कोठला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
इरफान शेख हा पसार झाला आहे. नगर- पुणे महामार्गावरून शिरूर येथून नगर शहरातील कोठला भागातील मंगलगेट येथे चार पिकअपमधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणली जात असल्याची माहिती काल, बुधवारी पहाटे वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना मिळाली होती. त्यांनी रात्र बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, पोलीस अंमलदार सय्यद, अतुल लगड, राजू गव्हाण, मधुकर ससे यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विनोद गंगावणे, दीपक जाधव, सचिन बाचकर, सावळेराम क्षीरसागर यांना सोबत घेतले.
या पथकाने पहाटे सहाच्या सुमारास कोठला भागात नाकाबंदी केली असता शिरूर बाजूकडून कोठल्याच्या दिशेने येणार्या चार संशयित पिकअप पोलिसांनी थांबविल्या. त्यातील चौघांना ताब्यात घेतले. त्या पिकअपची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये पाच मोठी व 61 लहान अशी एकूण 66 जनावरे मिळून आली. सदरची जनावरे इरफान शेख याच्या मालकीची असल्याची कबुली पिकअपमधील चौघांनी दिली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार व्ही. सी. गंगावणे करत आहेत.