अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कत्तलीसाठी टेम्पोतून घेऊन जाणार्या 27 जनावरांची सुटका केली. जनावरे व टेम्पो असा सात लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. शनिवारी (21 डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास वाळुंज बायपास शिवारात पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने ही कारवाई केली. याप्रकरणी चांगदेव गोरख भालसिंग (वय 32 रा. वाळकी ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद शहानवाज शेख (वय 40 रा. गोविंदवाडी, कल्याण वेस्ट, जि. ठाणे), मुस्तारबा मिरमहंमद शेख (वय 55 रा. भिवंडी, ठाणे) व राहील ऊर्फ महंमद हुसेन शेख (रा. कल्याण वेस्ट, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे असून त्यांना ताब्यात घेतले आहे. टेम्पोतून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांना मिळाली होती.त्यांनी सोलापूरकडून कल्याणकडे जाणार्या वाळुंज बायपास रस्त्यावर शनिवारी सायंकाळी संशयित टेम्पो (एमएच 12 व्हीएफ 1338) ताब्यात घेतला.
त्या टेम्पोत एकूण 27 म्हैसवर्गीय जनावरे मिळून आली. याची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरचा टेम्पो व जनावरे असा एकूण सात लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अधिक तपास खरमाळे करत आहेत.