Wednesday, June 26, 2024
Homeनगरकत्तलखान्यांवर कारवाईसाठी दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती

कत्तलखान्यांवर कारवाईसाठी दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

संगमनेर शहरांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी कठोर पावले उचलली आहेत. खास कत्तलखान्यासाठी दोन स्वतंत्र पोलिसांची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले असून काल शनिवारपासून तातडीने कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केली आहे.

संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत जमजम कॉलनी, मदिनानगर, भारतनगर या भागात खुलेआम बेकादेशीर कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल केली जात आहे. अवैध गोमांस कत्तलीच्या तक्रारी डीवायएसपींना प्राप्त झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पथकाने अनेकदा या कत्तलखान्यांवर कारवाया केल्या आहेत. सदर ठिकाणी भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने डीवायएसपींनी त्या कत्तलखान्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.

त्यांनी काल पोलीस अधिकार्‍यांना पत्र पाठवून महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता 26 ऑगस्टपासून दररोज संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जमजम कॉलनी, मदिना नगर, भारतनगर येथे बंदोबस्त व पेट्रोलिंग कामी सर्व तालुका व शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांनी या पोलीस कर्मचार्‍यांची वेळोवेळी तपासणी करून कारवाईबाबत माहिती द्यावी, असे त्यांनी कळविले आहे. कत्तलखाना परिसरात काम करणार्‍या पोलिसांनी दिलेल्या वेळेत गस्त घालावी, अवैध कत्तलखाने यांचे ठिकाणाबाबत माहिती करून घ्यावी तसेच सदर ठिकाणी (वाडे) चेक करण्याबाबतचे फोटो संगमनेर डिव्हिजन ग्रुपवर पाठवावे, कत्तल केलेले गोवंश मांस मिळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा, जिवंत जनावरे मिळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला पुढील कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.

डीवायएसपी वाघचौरे यांनी कत्तलखान्याबाबत कठोर भूमिका घेतल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नेमके काय काम करतात असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. शहर पोलीस त्यांच्या ठाण्याच्या हद्दीमध्ये खुलेआम कत्तलखाने सुरू असताना पोलीस अधिकारी या कत्तलखान्यावर कारवाई का करत नव्हते, वरिष्ठ अधिकार्‍यांना या कत्तलखान्याच्या बाबतीत लक्ष घालण्याची वेळ का आली? असे सवाल आता विचारले जाऊ लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या