Saturday, May 9, 2026
Homeनगरकत्तलखान्याविरोधात आ. जगताप आक्रमक

कत्तलखान्याविरोधात आ. जगताप आक्रमक

रस्त्यावर मांस आढळल्याने कोठला भागात आंदोलन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर मांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर आ. संग्राम जगताप व आ. विक्रम पाचपुते यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सुमारे दीड ते दोन तास रास्तारोको आंदोलन करून पोलीस व महानगरपालिकेच्या प्रशासनाचा निषेध केला. जर तातडीने शहरातील छुप्या कत्तलखान्यावर कारवाई झाली नाहीतर 25 सप्टेंबर रोजी मार्चा काढण्यात येईल, असा इशारा आ. जगताप यांनी दिला. दरम्यान, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी उद्यापासून (17 सप्टेंबर) शहरातील सर्व कत्तलखान्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.

- Advertisement -

यावेळी आ. जगताप म्हणाले, राज्यातील महायुती सरकारने गोहत्या बंदी कायदा आणला आहे. मात्र तरीही काही लोकांकडून गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात आहे. प्रशासन याकडे कानाडोळा करत आहेत. शहरात कोणताही अधिकृत कत्तलखाना नाही, मात्र शहरातील काही भागात घराघरात छुपे कत्तलखाने राजरोसपणे सुरू आहेत. मध्यरात्री नंतर वाहन भरून माल पाठवला जातो.

प्रशासन जोपर्यंत याविरोधात कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील. रस्त्यावर मांस आणून टाकणार्‍यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा पवित्रा आ. जगताप यांनी घेतला. यावेळी आ. पाचपुते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. रस्त्यावर मांस टाकण्यात आल्याने हा प्रशासनाचा नाकर्तेपणा असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. भगव्या टोप्या व पंचे घालून हातात झेंडे घेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, प्रताप दराडे यांनी फौजफाट्यासह धाव घेतली. काही वेळाने मनपा आयुक्त डांगे आंदोलनस्थळी दाखल झाले. मनपा व पोलीस प्रशासनाच्यावतीने कत्तलखान्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली.

ताज्या बातम्या