Thursday, December 12, 2024
Homeनगरकोपरगाव पालिकेकडून गाळमिश्रीत पाणीपुरवठा

कोपरगाव पालिकेकडून गाळमिश्रीत पाणीपुरवठा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरात पालिकेकडून पुरवले जाणारे पाणी गाळ मिश्रित असल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक नागरिकांना पोटाचे विकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्यामुळे तसेच कोपरगाव नगरपालिकेत प्रशासक राज असल्यामुळे शहराला होणार्‍या दूषित पाणीपुरवठ्याविरुद्ध कुठलाही पक्ष अथवा नेता आवाज उठवताना दिसत नाही.

- Advertisement -

नाशिक धरण परिक्षेत्रात वाढत्या उष्प्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी, झपाट्याने शिल्लक पाणी कमी होत आहे. धरणात केवळ 28.20 टक्के पाणी शिल्लक असल्याने पुढील आवर्तनाचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे कोपरगाव शहराला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आठदिवसा ऐवजी दहा दिवसाआड केला जात आहे.

धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाणीसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागामार्फत पाणी काटकसरीने वापरण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. डाव्या कालव्याद्वारे येणारे आवर्तन उशिरा सोडणार असल्यामुळे पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी 21 एप्रिल पासून होणारा पाणीपुरवठा हा 10 दिवसाआड करण्यात येत असल्याची माहिती मनोजकुमार पापडीवाल यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नागरीकांनी आपल्या भागात असलेल्या विंधन विहीरीचा वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा व नगरपरिषद प्रशासन लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत आहे.

नाशिक जलसंपदा विभागाच्यावतीने पिण्याच्या पाण्याचे यंदाचे शेवटचे आवर्तन सुरू आहे. बहुदा 12 किंवा 13 तारखेला आवर्तन सुटेल. पाणी नाशिकहून कोपरगाव पर्यंत यायला किमान तीन दिवस लागतील, याची सर्वानी नोंद घ्यावी व नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने कोपरगाव शहराला होणार्‍या पाणीपुरवठ्यात दहा दिवसाआड देखील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसून नुकत्याच पुरवण्यात आलेले पाणी हे गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त होते. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरातील कोणताही नेता अथवा नगरसेवक या प्रश्नाकडे लक्ष देत नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या