नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक परिमंडळात नाशिक आणि नगर जिल्ह्यात 20 लाख ग्राहक आहेत. यातील 11 लाख ग्राहक नाशिक जिल्ह्यात आहेत. पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने हे मीटर मिळणार आहे.
जर तुम्ही बाहेर गावी गेला आहात तर एक रुपयाही वीजबिल येणार नाही. अशी व्यवस्था असणारे व आगाऊ रक्कम भरून प्रिपेड स्वरुपातील स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी आता वीज वितरण कंपनी सज्ज झाली आहे. जिल्ह्यात 11 लाख वीज ग्राहकांसाठी हे मीटर बसवले जाणार आहे. थकबाकी वसुलीसाठी दर महिन्याला करावी लागणारी कसरत आता कर्मचार्यांना करावी लागणार नाही.
ग्राहकांना विजेच्या खर्चावर नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रिपेड स्मार्ट मीटर आता महावितरणतर्फे बसवले जाणार आहेत. नव्या मीटरमुळे वसुलीच्या कामातून कर्मचारी मुक्त होणार आहे. मात्र त्यामुळे काही जणांना नोकरीपासून विंंचत राहण्याची वेळ येणार आहे. यामुळे ग्राहकांना वीज वापराचा खर्च निश्चित करता येईल. महावितरणलाही त्याचा फायदा होईल.
ग्राहकांसाठी हे मीटर उपयुक्त असल्याचा प्रचार वीज कंपनीकडून सुरु झाला आहे. स्मार्ट मीटर बसविल्यावर ग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेचेे भरून वीज वापरु शकतील. विजेवर किती खर्च करायचा, हे त्यांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली, याची माहिती नियमितपणे फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशांपैकी किती पैसे शिल्लक आहेत, पुढे विजेचा वापर किती करायचा, हे समजणार आहे.
नाशिक जिल्ह्यात 11 लाख ग्राहकांकडून देयक वसुलीचे काम दरमहा होते. बरेचजण चालू देयके नियमित भरत नाहीत. वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावावा लागतो. नोटीस द्यावी लागते. त्यात काही दिवसांची मुदत देऊन वेळेत भरणा न झाल्यास वीजपुरवठा खंडित केला जातो. देयक थकबाकीचे प्रमाणही मोठे आहे. वसुलीवर बराच ताण येतो. थकबाकी वसुली, वीजपुरवठा खंडित करताना कधीकधी हाणामारी होते. स्मार्ट मीटरमुळे देयक वसुलीच्या कामातून वीज कंपनीतील सर्व मुक्त होतील.
जुन्या मीटरमध्ये लोक सहज बिघाड करुन आकडे टाकून वीज घेत होते. छेड़छाड़ करणे कमालीचे सोपे झाले होते. 100 युनिट वीज वापरुनही मीटरमध्ये 10 युनिट रीडिंग करता येत होते. त्यामुळे कंपनीला बरेच नुकसान होत होते. काही लोक वीजचोऱी करत होते. त्याचा भार प्रामाणिक बिल भरणार्या ग्राहकांंना वीज गळतीच्या नावाने सहन करावा लागत होता.
स्मार्ट मीटरचा फायदा
वीजबिल फोनवर रिचार्ज करता येईल.
विना रिचार्ज बिलच मिळणार नाही.
रिचार्जच्या प्लाननुसार वीज वापर शक्य होईल.
वीजवापराचे नियोजन करता येईल.
बाहेरगावी गेल्यास त्याचे बिल भरावे लागणार नाही.
वीजचोरीला आळा बसेल.