Friday, July 5, 2024
Homeनगरसुरेगाव शासकीय वाळू डेपोतून वाळुची तस्करी

सुरेगाव शासकीय वाळू डेपोतून वाळुची तस्करी

कोळपेवाडी |प्रतिनिधी| Kolpewadi

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शासकीय वाळु डेपोतून रात्रीच्या वेळी वाळूतस्करीने जोर पकडला असून महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा वाळूतस्कर उचलत आहे. सुरेगाव शासकीय गौण खणिज वाहतूक सायंकाळी सहा वाजता बंद झाल्यानंतर दिवसा वैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनाबरोबर अनेक अवैध ट्रॅक्टर, ट्रक रात्री गोदावरी नदीपात्रात उतरून जेसीबीच्या साह्याने अवैध वाळूउपसा करतांना नागरिकांना आढळुन येत आहेत. महसूल प्रशासन शिर्डी लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा वाळूतस्करांनी उचलला आहे. नदीचे पाणी आटल्यानंतर बोटीने वाळू काढणे बंद झाल्यानंतर ठेकेदाराने पोक्लेन, जेसीबी सारखी अवजड यंत्रे गोदावरी नदीपात्रात उतरून वाळू काढण्याचा सपाटा लावलेला असतांना तहसीलपासून जिल्हाधिकारी गौण खणिज कार्यालयाचे पूर्णपणे झालेले दुर्लक्ष गोदावरी नदीतून अवैध वाळूउपशास उत्तेजन देत आहे.

नदीपात्र उघडे झाल्याने ठेकेदारास वाळु काढणीस खर्च कमी येत आहे. त्यामुळे शासनाने वाळुची किंमत कमी करणे अपेक्षित असतांना ठेकेदाराच्या भल्यासाठी अधिकारी वर्गाने केलेली डोळेझाक सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेतून सुटलेली नाही हे प्रशासनाने जाणणे गरजेचे आहे. सकाळी वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पावती सायंकाळपर्यंत वेळ बदलून वापरण्यात येवून बहुतांश वाळू नाशिक जिल्ह्यातील पंचाळे, वावी शहा गावात गोलमाल करत पोहचवली जाते.
वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ट्रक, टॅ्रक्टर यांची आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशन टॅक्स व्यवसाय परवाना नोंदणी केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच वाहनांना असल्याचे नागरिक बोलत असताना श्रीरामपूर मोटार वाहन निरीक्षक कार्यालय यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखले आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. सुरेगाव गोदावरी नदीपात्रातील पाण्यामधून बोटीद्वारे साडेचार हजार ब्रास वाळू उत्खनन करण्याचा परवाना व्हाईट स्टोन इंन्टरप्राईजेस मुंबई या आस्थापनेस नियम अटीचे काटेकोरपणे बंधन घालून दिलेला आहे. काही दिवस सहाशे रुपये ब्रासने मिळणार्‍या वाळूची अचानक सरकारी किमंत शासनाने दोन हजार तिनशे सात रुपये केल्याने सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर बांधणीचा खर्च आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांनी घराचे काम अर्धवट सोडत शासनाच्या दुटप्पी धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली.

शासकीय वाळू भाव वाढीमुळे वाळूतस्करीला आपसुकच प्रोत्साहन मिळाल्याने तस्करांनी आपला मोर्चा नदीपात्रात उतरून तालुक्यातील मुर्शतपूर, धारणगाव, कुंभारी, माहेगाव, कोळगाव थडी, सुरेगाव आदी ठिकाणाहून टॅ्रक्टरच्या साह्याने वाळू उपसा करुन नदीपात्र उजाड बनवले आहे. कोपरगाव महसूलच्या अवैध वाळूतस्करी रोखणार्‍या पथकाची अवस्था जखम मांडीला मलम शेंडीला! अशी असल्याने तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूतस्करी रोखणे हे दिवसा स्वप्न ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या