कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
दो पल के अंधेरे का अंत जल्द ही तय हैं, रखिए हौसला अब नजदीक सही समय हैं, अशी शायरी पोस्ट करत, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सोशल मीडियातून कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. ‘कधी कधी दोन पावले मागे येणे म्हणजे दहा पावले पुढे जाण्यासाठी घेतलेली भूमिका असते’. भविष्यात पुढे होणार्या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एकजुटीने लढू आणि जिंकू, असे सांगत त्यांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले.
स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे की, निवडणुकीचे बिगुल वाजले अन बर्याच गोष्टी घडल्या. या दरम्यान गेले अनेक दिवस आपण सर्वजण मला, बिपीनदादा कोल्हे आणि खास करून विवेक कोल्हे यांना विविध माध्यमांतून संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात. आम्हाला कल्पना आहे हा काळ सर्वांसाठी अतिशय घालमेल करणारा आहे. तुमच्या भावना आणि कोल्हे कुटुंबाला मिळणारी साथ अविस्मरणीय आहे. स्व.शंकरराव कोल्हे यांच्यापासून जोडलेला आपला ऋणानुबंध हा तीन पिढ्या घट्ट आहे. कार्यकर्ता हा आमच्यासाठी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे मार्गदर्शन, अनेकांचा संघर्ष आणि युवकांच्या अपेक्षा हे सर्व लक्षात घेऊन केवळ निवडणुकीपुरते नाही तर भविष्यातील दूरदृष्टी जपून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. सध्या नीटपणे विचार केला तर दहा वर्षे आपण भारतीय जनता पार्टीत निष्ठेने काम करत आहोत.
पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत. अनेकदा आपण जिथे अधिकार असेल तिथे भांडतो. जरी कधी कधी अन्याय झाला असेलही पण तरी आपण पक्षाला मजबूत ठेवण्यासाठी काम करणारे विश्वासू सहकारी आहोत. हीच आपली विश्वासाची वृत्ती आणि निष्ठा संघर्षाला न्याय देणारी ठरेल. सत्ता ही सेवेसाठी म्हणून बघणे हा आपला पिंड आहे. गेले काही काळ मतदारसंघात केवळ कागदोपत्री विकास असला तरी प्रत्यक्षात खरा विकासाचा धागा विणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सत्तेतून सेवेची संधी देण्यासाठी आपली दखल पक्ष सर्वच पातळीवर घेतो आहे. राज्यात महायुती असल्यामुळे पक्षाची जागा वाटपात अडचण झाली.
यात आपल्याला विजयाची खात्री असतानाही जे काही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेतून समोर आले त्यानुसार सध्या आपण पुढे जाणार आहोत. भविष्य अधिक सन्मानाचे असेल कारण आपल्या आजवरच्या विश्वासाची ती पावती ठरणार आहे. कुणाला धोका देऊन पुढे जाण्याची आपली वृत्ती नाही. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी देखील विवेक यांच्या धाडसी आणि आश्वासक कार्याची दखल घेतली आहे. योग्य ते पावले त्यादृष्टीने पडतील, असा विश्वास आहे. यावेळी जे काही होईल ते सर्वांच्या हिताचे होईल, असेही स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.