Sunday, September 8, 2024
Homeनगरपावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या - सौ.कोल्हे

पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या – सौ.कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघात वादळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे प्रशासनाने 14 गावांसाठी पंचनाम्याचे आदेश पारीत केले.

- Advertisement -

परंतु वादळी पावसामुळे संपूर्ण मतदारंसघातील पिके नष्ट झाली असून सर्वच गावांतील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तरी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नहेलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

वादळी पावसामुळे शेतातील उभी पिके, मका,कपाशी, बाजरी, सोयाबीन, कांदारोपे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पावसाच्या तडाख्यामुळे उभी असलेली पिके पूर्णपणे खराब झाली. यापूर्वीही या भागावर नैसर्गिक आपत्ती येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, या संकटातून सावरतानाच पुन्हा शेतकर्‍यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे.

यासाठी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने 14 गावांसाठी पंचनाम्यांचे आदेश पारित केले त्यात अनेक गावांचा उल्लेख न झाल्याने अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, वेस, सोयेगाव, रांजणगाव देशमुख, काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव या भागातील शेतकर्‍यांनी संपर्क कार्यालयात समक्ष येऊन नुकसान भरपाई मिळावी म्हणून लेखी मागणी केलेली आहे.

सध्याच्या करोना परिस्थितीमुळे शेतकर्‍यावर मोठे आर्थिक संकट आले आहे, त्यामुळे उदरनिर्वाहाबरोबर अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहेत. शेतकर्‍यांनी उसनवारी करून शेतात पेरणी केली होती. काही दिवसांतच या पिकांची काढणी होऊन शेतकर्‍यांच्या दारात धान्याची रास पडली असती.

मात्र झालेल्या वादळी पावसाने शेतकर्‍यांचे स्वप्नच उद्ध्वस्त करून टाकले आहे. शासन स्तरावरून त्वरीत मतदारसंघातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळवून देण्यासाठी संबंधित कार्यान्वीत यंत्रणेस आदेश व्हावेत, अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या