नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोनाच्या ( Corona)नव्या साथीचा भारताला धोका नसला तरी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना खबरदारी म्हणून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रुग्णालयांमध्ये प्राणवायूपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेण्याची व उपलब्ध यंत्रणेचा आढावा घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिनचे दीड लाख डोस (Corona Vaccines )उपलब्ध आहेत. आजपासून (दि. 26) लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली.
दोन वर्षांपूर्वी जगभर हाहाकार माजवणारा करोना आता पुन्हा परतला आहे. पुन्हा तो धुमाकूळ घालू लागला आहे. चीन, अमेरिकेसह काही देशांतील संसर्ग लक्षात घेऊन भारतातही सतर्कता बाळगली जात आहे. महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये येणार्या भाविकांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. करोनाचे संकट उभे राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात उद्यापासून कोवॅक्सिनचा पहिला, दुसरा व प्रि-कॉशन डोस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये आदी ठिकाणी लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. ज्यांचा पहिला, दुसरा वा प्रि-कॉशन डोस बाकी आहे त्यांनी तो जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सध्या जिल्ह्यात लसीकरणाबरोबरच टेस्टिंगचेही प्रमाण हळूहळू वाढविण्यात येणार आहे. ही तपासणी आर्टिफिशियल करण्यात येणार असून ती विविध ठिकाणी करण्यात येणार असूनयासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रावर व्हॅक्सिनेशन देण्यात येणार असून आर्टिफिशियल ची टेस्टिंगही करण्यात येणार आहे.
कोविशील्डसाठी प्रतीक्षा
जिल्ह्यात कोविशिल्ड लसींचा खडखडाट असून काही केंद्रांवरून कोवॅक्सिन लसही उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्ह्यात सुमारे 90 टक्के लोकांनी लसीचा पहिला तर 80 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. बूस्टर डोसचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेणार्यांना दुसरा डोस या लसीचाच घ्यावा लागणार आहे. मात्र सध्या ही लस उपलब्ध नाही. काही दिवसांपासून लसीकरणाला प्रतिसाद नसल्याने शिल्लक लशींची मुदत दि.5 डिसेंबरला संपलेली आहे. त्यानंतर जिल्ह्याला नव्या लसींचा पुरवठा होऊ शकलेला नाही. जिल्ह्यात 400 लसीकरण केंद्रे होते. त्यापैकी सध्या 20 ते 25 केंद्रेच सुरू आहेत. नाशिक शहरातील काही रुग्णालये, जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये फक्त ङ्गकोव्हॅक्सिनफ लसच उपलब्ध आहे. आधीचे दोन डोस कोणत्याही लसीचे घेतले असले तरी कोवॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येऊ शकतो. मात्र पहिला डोस ङ्गकोविशील्डफचा घेतला असल्यास दुसरा डोस याच लसीचा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना तूर्तास कोव्हिशिल्ड लशीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस
करोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क असून तूर्तास लसीकरणावर पुन्हा भर दिला जात आहे. मात्र सध्या केवळ कोव्हॅक्सिनची लसच उपलब्ध आहे. ङ्गकोविशिल्डफचा तुटवडा असल्याने संपूर्ण राज्यात कोविशिल्डचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही ही लस सध्या मिळत नाही. मात्र ज्यांना बूस्टर डोस घ्यावयाचा आहे त्यांनी कोव्हॅक्सिन घेतला तरी चालेल, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.