नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळणार्या कामामध्ये वाढ करण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची वाढती संख्या लक्षात घेता सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या कामवाटपाचे सध्या असलेले ३३ टक्केचे प्रमाण वाढवून ४० टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यात साडे चार हजार अभियंत्यांनी नोंदणी केली असून त्यांना एकावेळी ५० लाखापर्यंतची कामे दिली जात आहेत…
ग्रामविकास विभागामार्फत त्रि-स्तरीय पंचायती राज संस्थाच्या अखत्यारितील विकास कामे पार पाडण्यासाठी मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगारअभियंत्यांना ग्रामविकास विभागामार्फत नोंदणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयान्वये प्रथम सुशिक्षित बेरोगजार अभियंता यांचे नोंदणीकरण, सवलती व कामवाटप समिती रचना व कार्यपध्दतीबाबत तरतूदी करण्यात आल्या होत्या. सदर तरतूदीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
तर ग्रामविकास विभागांतर्गत देण्यात येणार्या सवलतींमध्ये वाढ करणेबाबतची मागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व वैयक्तिक अर्जदार यांनी केली होती. सदर अहवाल शासनाने स्विकारला. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या नोंदणीशी संबधित समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने शासन निर्णयातील काही तरतूदी अधिक्रमित करुन नविन सुधारित तरतूदी व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या नोंदणीशी संबधित सद्यस्थितीत लागू असलेल्या इतर तरतूदी यांचे एकत्रिकरण करुन सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या नोंदणीशी संबंधित सर्वसमावेशक धोरण तयार केले गेले आहे.
तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) यांचे नोंदणी जिल्हा परीषदेत केली जात आहे. त्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी अथवा; महाराष्ट्र राज्य तांत्रिक परीक्षा मंडळाने विहित केलेली स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका किंवा राज्याबाहेरील शासन मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामधुन प्राप्त केलेली पदवी/ पदविका तथापि अशी पदवी/ पदविका ही राज्याच्या स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविकेच्या समकक्ष असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यापासून १० वर्षाच्या आत विहित नमुन्यात (परिशिष्ट-1 नुसार) अर्ज करणे आवश्यक आहे. अभियंता बेरोजगार असल्याबाबत आणि कुठेही नोकरी करत नाही अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र. तसेच सेवायोजन कार्यालयात नोंदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कामे दिली जात आहेत. त्यामुळे अभियंत्यांना दिलासा मिळत आहे.