Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखसामाजिक आरोग्यासाठी डॉक्टर आणि रुग्णात सुसंवाद आवश्यक

सामाजिक आरोग्यासाठी डॉक्टर आणि रुग्णात सुसंवाद आवश्यक

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. आत्तापर्यंत रुग्ण किंवा त्याच्या उपचारांशी संबंधित मुद्यांवरुन वादविवाद होत होते. तथापि आता पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला तरी त्यासाठी डॉक्टरांना जबाबदार ठरवले जाऊ लागले आहे. नुकतीच पुण्यात अशी घटना घडली. डॉक्टरांनी उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याने पाळीव मांजरीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मांजरीच्या मालकांनी डॉक्टरांना मारहाण केली. यासंदर्भात पोलीसात गुन्हा दाखल आहे. तात्पर्य, डॉक्टर आणि रुग्णाचे नाजूक नाते धोकादायक वळणावर आले आहे. डॉक्टर-रुग्ण परस्पर संवाद आणि विश्वास धोक्यात आल्याची शंका यावी अशी सद्यस्थिती आहे. पूर्वीही रुग्णांचे रुग्णालयात मृत्यू होत होते. पण तेव्हा अशा घटना क्वचित देखील घडल्याचे माणसांच्या आठवणीत नाही. उलट ज्येष्ठ माणसे कुटुंबाच्या डॉक्टरांच्या (फॅमिली डॉक्टर) आठवणीत रमताना आढळतात. यावर्षीच्या डॉक्टर्स डे ची संकल्पनाही ‘फॅमिली डॉक्टर्स आता अधिक महत्वाचे (फॅमिली डॉक्टर्स ऑन दि फ्रंटलाईन)’ अशी आहे. परस्पर संवाद आणि विश्वासाच्या बळावरच फॅमिली डॉक्टरांना कुटुंबात मानाचे स्थान दिले जायचे. आजही दिले जाते. तथापि वादाचे प्रसंग वारंवार उपस्थित होऊ लागले आहेत. परस्परांविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे. डॉक्टर आणि रुग्णातील जिव्हाळ्याचे नाते कालौघात वादग्रस्त का ठरते याचा विचार संबंधित सर्वच घटकांनी करायला हवा. कारणे शोधून त्यावर उपाय योजले जायला हवेत. वैद्यकीय उपचार कमालीचे महागडे होत आहेत. ते होतच जातील असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मांडतात. आजारांचेही स्वरुप बदलत आहे. नवनव्या व्याधींची भर पडत आहे. त्यात परस्पर अविश्वासाची भर पडून चालेल का? उपचारांविषयी मनात साशंकता ठेऊन डॉक्टरकडे जाणे योग्य ठरेल का? ते डॉक्टर आणि दोघांनाही परवडणारे नाही. महागडे होत चाललेले उपचार हेही विसंवादाचे एक कारण असू शकेल का? पाण्यासारखा पैसा खर्च केला पण रुग्ण वाचला नाही असे म्हणुनच म्हटले जात असेल का? कोणत्याही डॉक्टरकडे जा, चाचण्यांचा फेरा मागे लावला जातो, डॉक्टर पुरेसा वेळ देत नाहीत आणि उपचारांविषयी नीट समजावून सांगत नाहीत असा रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा आक्षेप आढळतो. तर कायद्याचा आधार घेऊन तक्रार दाखल करण्याचे आणि डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळेच सर्व प्रकारच्या चाचण्यांच्या अहवालाच्या आधारे उपचार करण्याकडे कल वाढत असल्याचे डॉक्टर सांगतात. यात सुवर्णमध्य साधला जायला हवा. वैद्यकीय साक्षरतेचा प्रसार केला जायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही. डॉक्टर रुग्णांना जीवनदान देतात म्हणून लोक डॉक्टरांना देवासमान मानतात. तथापि या भावनेचा अतिरेक करुन चालेल का? रुग्ण दगावण्याच्या प्रत्येक घटनेस डॉक्टरच जबाबदार असतील असे नाही आणि उपचारांच्याही मर्यादा असतात याचे भान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी राखायला हवे. डॉक्टरांनाही एक पाऊल पुढे टाकायला हवे. रुग्णाची अवस्था, उपचार आणि त्यासाठी येणारा संभाव्य खर्च याबाबत पारदर्शकता ठेवायला हवी. नातेवाईकांच्या शंकांचे वेळोवेळी निरसन करायला हवे. रुग्णाची मानसिकता लक्षात घेऊन संवाद साधण्याचे कौशल्य जोपासायला हवे. त्यांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करायला हवा. रुग्णांच्या सोयीसाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जातात. त्या रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक संस्थाही पुढाकार घेऊ शकतील. सामाजिक आरोग्य राखायचे असेल तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचेच नाते असायला हवे. त्याचे निर्माण आणि जपवणूक ही सामुहिक जबाबदारी आहे याचा विसर पडता कामा नये. 

- Advertisment -

ताज्या बातम्या