Saturday, May 18, 2024
Homeअग्रलेखडॉक्टर-रुग्ण संवादातच समाजहित

डॉक्टर-रुग्ण संवादातच समाजहित

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नाशिकमध्ये बोलताना एका महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला. डॉक्टर आणि रुग्ण परस्पर संबंध, हा तो मुद्दा! आरोग्य विज्ञान विद्यापीठाची आढावा बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. वैद्यकीय शिक्षण पदवीधरांना संवाद कौशल्य शिकवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रुग्णांशी डॉक्टरांचा संवाद नम्र असावा, हे कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा एक भाग असावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध अविश्वासाने झाकोळले आहेत. अधून-मधून वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत.

अनेकदा हे संबंध इतके ताणले जातात की, रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांवर आरोप करतात. रुग्णाच्या मृत्यूला डॉक्टरांना जबाबदार ठरवून रुग्णालयातील साहित्याची मोडतोड करतात. डॉक्टरांना मारहाण करतात. क्वचितप्रसंगी मामला पोलिसात पोहोचतो. एक-दोन दशकांपूर्वी पर्यंत हे संबंध आपुलकीचे होते. डॉक्टर अनेक कुटुंबांचे सदस्य मानले जायचे. कठीणप्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा. त्यांच्या शब्दांना मान होता. नंतरच्या काळात हे संबंध कळत-नकळत बिघडून कमालीचे तणावग्रस्त का बनत गेले? याचा विचार संबंधित घटक करतील का? वैद्यकीय पेशाचे स्वरूप आता बदलले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचारांत सहजता आणण्याचा प्रयत्न होत आहे. निदान अचूक होण्याच्या शक्यता वाढल्या. अनेक प्रकारच्या दुर्धर व्याधी बऱ्या होण्याचा संभव वाढला. रुग्णालयांनीही कात टाकली. बरोबरीने रुग्णांची संख्या कमालीची वाढली. डॉक्टरही व्यस्त झाले. डॉक्टर पुरेसा वेळ देत नाहीत, उपचारांची दिशा समजावून सांगत नाहीत, अशी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची तक्रार आढळते. बऱ्याचदा रुग्णाला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले जाते. निदान आणि उपचाराबाबत संयम बाळगला जात नाही. मारहाण करण्याची किंवा पोलिसात तक्रार करण्याची धमकी काही वेळा दिली जाते, अशी भावना डॉक्टर मांडताना आढळतात. डॉक्टर आणि रुग्ण परस्पर संवाद आणि विश्वास हा वैद्यकीय सेवेचा पाया आहे, याची जाणीव संबंधित सर्वच घटकांनी ठेवण्याची गरज आहे. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना वेळ देणे, रुग्णाची स्थिती, निदान व उपचार, अत्यावश्यक चाचण्या याविषयी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी डॉक्टरांनी वेळ द्यावा, अशी त्यांची अपेक्षा असते. कितीही व्यस्तता असली तरी डॉक्टर अपेक्षापूर्ती करू शकतात. रुग्णांचीदेखील समज वाढायला हवी. रुग्ण डॉक्टरांना देवदूत मानतात. रुग्णांना जीवनदान देतात म्हणून त्यांच्याविषयी कमालीचा आदर बाळगतात. तथावणी डॉक्टर परमेश्वर नाही हे त्यांनी समजून घ्यायला हवे. देवदूत भावनेचा अतिरेक योग्य नव्हे. रुग्णालयात रुग्ण दाखल होण्यापासून त्याला डिस्चार्ज देण्यापर्यंतच्या प्रत्येक पातळीवर आपुलकीच्या भाषेत साधला जाणारा परस्पर संवाद आणि पारदर्शकता हाच कळीचा मुद्दा आहे. पारदर्शकता राखली जाईल आणि संवाद जेवढा सृदृढ होईल तेवढे डॉक्टर-रुग्ण संबंध दृढ होत जातील. असा संवाद साधणे हा आतापर्यंचा अनुभवाचा भाग होता. कनिष्ठ डॉक्टर त्यांच्या वरिष्ठांकडून याची कला शिकत. तो अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. आता तो तसा असावा, असे राज्यपालांनी सुचवले आहे. त्यांच्या सूचनेचे समाज स्वागतच करेल. नव-नव्या व्याधी, रुग्णांची वाढती गर्दी, व्यस्त होत चाललेले डॉक्टर्स या परिस्थितीत सुवर्णमध्य साधणे आणि वैद्यकीय व्यववसायातील विश्वासार्हता जपणे यातच समाजहित दडले आहे. राज्यपालांनादेखील तेच सुचवायचे असावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या